ऐसा घडलो!

योगेश राऊत
बुधवार, 10 जानेवारी 2018

शाईचा पेन हवा म्हणून त्याला कांदे काढणीसाठी जावे लागले. कधी वाळू टाक, तर कधी वेटर हो. शिकण्याच्या ओढीपुढे कष्ट वाटत नव्हते. तो शिकला, इंजिनिअर झाला तरी अंगणातील मातीत खेळायला नाही लाजला.

शाईचा पेन हवा म्हणून त्याला कांदे काढणीसाठी जावे लागले. कधी वाळू टाक, तर कधी वेटर हो. शिकण्याच्या ओढीपुढे कष्ट वाटत नव्हते. तो शिकला, इंजिनिअर झाला तरी अंगणातील मातीत खेळायला नाही लाजला.

विमान पुण्याच्या दिशेने आकाशात झेपावले खरे; पण माझे मन त्याआधीच घरी पोचले होते. घरची परिस्थिती हलाखीची होती. मी चौथीतून पाचवीत गेलो तेव्हा आईकडे शाईपेन घेण्यासाठीचा हट्ट केला होता. पण तो तीस रुपयांचा पेन घेणेही शक्‍य नव्हते. ती रक्कम म्हणजे आईची एका दिवसाची मजुरी. मग मी एका रविवारी शेजारच्यांकडे कांदे काढणीसाठी गेलो. सायंकाळी शेतमालकाने हातावर पंचवीस रुपये ठेवले. उरलेले पाच रुपये आईने आनंदाने दिले. दुसऱ्या दिवशी लवकर आवरून मी शाळेला गेलो. स्वकष्टातून घेतलेला पहिला शाईचा पेन माझ्यासाठी अप्रुपाची गोष्ट होती. पुढे त्याच पेनाने मी दहावीचे पेपर लिहिले.

शाळेत असताना शैक्षणिक सहल निघायची. वर्गावर्गांतून नोटीस फिरायची; पण सहलीचा विषय आम्ही भावंडांनी घरी कधी काढलाच नाही. शेतात रक्ताचे पाणी करून राबणारी आई पाहिल्यावर सहलीची मजा नको असायची. कित्येकदा सहलीला जाणाऱ्या बसची मजा आणि मित्रांच्या चेहऱ्यावरचा आनंद शाळेच्या भिंतीआडून बघितला होता. सहल परतल्यांनंतर मी छायाचित्रातूनच महाबळेश्‍वर, रायगड, शिवनेरी, कोकण, वेरुळ-अजिंठ्यांचे दर्शन घेत असे. पुढे नोकरीला लागल्यावर आईसोबत, मित्रांसोबत खूप फिरलो. त्या वेळी लहानपणी छायाचित्रांत बघितलेले ते अंधुक सहलीचे दृश्‍य आणि त्या वेळची माझ्या मनातली प्रतिमा आवर्जून आठवण्याचा प्रयत्न करीत राहिलो.

अकरावी-बारावीसाठी मी संगमनेर कॉलेजला आलो. आता कॉलेजची फी, वह्या-पुस्तके, प्रात्यक्षिकासाठी साहित्य घेणे भाग होते. अशावेळी मी ज्या महाविद्यालयात शिकत होतो, त्याच महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी तिसऱ्या मजल्यावर वाळू टाकण्याचे काम फरशी कंत्राटदार ताराचंद यांच्याकडून मिळाले. मी ढगळा शर्ट आणि तोंडाला उपरणे बांधून, सकाळ-संध्याकाळ जसा वेळ मिळेल तसा, तर कधी कॉलेज बुडवून काम केले. समोरून येणाऱ्या मित्राने किंवा शिक्षकांनी मला ओळखू नये, असे वाटे. ते ओळखतील ही भीती सतत वाटायची; पण तोंड बांधलेले असल्याने मी कधी कोणाला ओळखूही आलो नाही. त्याच तिसऱ्या मजल्यावर नंतरच्या काही महिन्यांत रसायनशास्त्र-भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळा झाल्या. तेथे प्रात्यक्षिके करताना मित्रांना ओरडून सांगावेसे वाटायचे, की "आपण ज्या फरशीवर उभे आहोत, त्याखालची वाळू मी टाकली आहे.' पण मला कधीच तसे धाडस झाले नाही. कारण कुणाचा सहानुभूतीचा खांदा मला नको वाटायचा.

कॉलेजपासून घर जवळ असल्याने मी वर्ग आणि प्रात्यक्षिके यामध्ये मिळणाऱ्या एक-दोन तासांत नेहमी घरी पळत सुटे. मग त्या वेळेत शेतकामात आईला मदत कर, पिकांना पाणी दे, गायींना चारापाणी दे, शेतबांधणी कर, अशी कामे पूर्ण करीत असे.
हलाखीची स्थिती संपणार नव्हती. शिकायचे तर होते. मग पदविका-अभियांत्रिकीला असतानाही काम करून शिकण्यासाठी पैसे मिळवणे सुरूच होते. हॉटेलात वेटरचे काम कर, तर कधी विजेच्या खांबांचे रंगकाम करायचे. पुढे वीज मंडळामध्ये सुरक्षारक्षकाची नोकरीदेखील केली. यातूनच शिकलो आणि घडलो. "कॉलेज कॅमस्‌'मधून निवड होऊन मी पुण्याला नोकरीसाठी आलो आणि त्यानंतरचे शिक्षण पूर्णवेळ नोकरी करून पूर्ण केले.

आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टींनी कमी-अधिक खूप शिकवले. परिस्थितीचे भान दिले. आईने वेळीच मेहनतीचा आणि चिकाटीचा कंदील हाती सोपवला आणि त्यासोबतचा प्रवास करत कधी जीवनाचा घाटमाथा संपला, हे कळलेच नाही. अशा अनेक आठवणींच्या दुधाळ ढगांतून माझा प्रवास पुन्हा माझ्या मायेच्या घराच्या ओसरीत येऊन पूर्ण झाला, ते कधी समजलेच नाही.

खरेच आज काट्याकुट्यांचा, खड्डे-अडथळ्यांचा रस्ता मागे टाकून खूप पुढे निघून आलो; पण आतापर्यंत आयुष्यात लागलेली सुख-दुःखाची वेडीवाकडी वळणे, अनेक अडथळे आणि परिस्थितीची झळ यातूनच मी शिकलो आणि सावरलोदेखील. त्यातच हसून-रडून घेतले आणि आयुष्य भरभरून जगत राहिलो. मला आयुष्यात उभे करण्यासाठी आईने घेतलेले कष्ट आठवतात. तिने माझ्यासाठी कधी ऊन-वाऱ्याची तमा बाळगली नाही. परिस्थितीशी झुंजत, शेतामध्ये राब-राब राबत राहिली. तिच्याकडून मिळालेल्या बाळकडूमुळेच आत्तापर्यंतची मजल मला करता आली. माझे पहिले पुस्तक "झळा' तयार झाले हे आईला सांगितले. तेव्हा ती म्हणाली होती, ""खरं तर आयुष्यात अनेक झळा बसतील, पण त्यांना सावरतच एखादी तडीस नेणारी पायवाट आनंदाने चालत राहा म्हणजे जगण्याचे सार्थक होईल!'' तिच्या त्या उद्‌गारासोबत माझ्या "झळा'सुद्धा प्रकाशित झाल्या, हेच लाभलेले समाधान.
शून्यातून सुरू झालेला हा प्रवास इथवर आला. आता आयुष्य जगताना कसलीच खंत नाही. मात्र, अजूनही सहलीच्या बसची वाट पाहणारा तो मुलगा, त्याच्या मनातली जिद्द आणि डोळ्यांतली स्वप्ने मी जिवंत ठेवली आहेत ती आयुष्यभरासाठी!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yogesh raut write article in muktapeeth