ज्येष्ठांची पुण्याई घ्या

muktapeeth
muktapeeth

जीवन हे क्षणभंगुर आहे, हे माहीत असूनही माणूस हव्यासापायी दुभंगू लागला आहे. समाजात आई-वडिलांना महत्त्वाचे स्थान होते; पण नवी पिढी त्यांना मातीमोल करू पहात आहे. जीवन जगण्यासाठी एखाद्या वयोवृद्ध ज्येष्ठाला कचराकुंडीचा आधार घ्यावा लागतो, ही गोष्टच मन हेलावणारी आहे. पितृपंधरवड्यात पंचपक्वान्नांचा बेत नक्कीच होतो; पण अशा निराधार ज्येष्ठांना जवळ करत त्यांच्या मुखी अन्न गेले, तर नक्कीच अशा ज्येष्ठांची पुण्याई मिळू शकेल.

वार्धक्‍याने केस पांढरे झाले होते. पांढरा मळकट सदरा अन्‌ डोक्‍यावर टोपी होती. जवळच कपड्याचे गाठोडे होते. कितीतरी दिवस जेवण न मिळाल्याने झोप आली नव्हती, त्यामुळे डोळेदेखील रडून रडून लाल झालेले दिसत होते. जवळच असणारा तरुण या ज्येष्ठांची विचारपूस करत होता. सोशल मीडियावरचा हा व्हायरल व्हिडिओ जीवनाची सत्यता दाखवीत होता. आजोबा अगोदर काहीही सांगायला तयार नव्हते. चौकशी केल्यावर आजोबांना रडू कोसळले.

आजोबा बोलू लागले. पत्नीचे 2002 मध्ये निधन झाले. तीन मुले आणि एक मुलगी असा प्रपंच; पण वार्धक्‍य आले आणि आजोबांना घर सोडावे लागले. मुले सांभाळत नाहीत, म्हणून जामखेडवरून हे आजोबा पायी नाशिकमधील मिग ओझर येथे आले होते. हा तरुण मात्र या आजोबांना घरी पोचविण्यासाठी आग्रह धरत होता. त्यांना मुले जेवण घालत नाहीत म्हणून वार्धक्‍यात भटकंती करावी लागली.

नुकताच सोशल मीडियावर ज्येष्ठांचा फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये ते कचराकुंडीत असणाऱ्या खरकट्या अन्नावर आपली उपजीविका भागवत असल्याचे कळले. यामधील सत्यता पडताळण्यापेक्षा अशा ज्येष्ठांना मदत करणे गरजेचे आहे. सामाजिक संस्थांनी अशा निराधार ज्येष्ठांचा शोध घेत त्यांना घरापर्यंत किंवा योग्य ठिकाणी पोचविण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.

पितृपंधरवडा सुरू होत असून, या काळात जेवणावळी राबविल्या जातात. सध्या बहुतेक ठिकाणी निराधार ज्येष्ठांसाठी वृद्धाश्रम तयार करण्यात आले आहेत. विविध परिसरात भटकंती करणाऱ्या, मंदिरांत- सभामंडपांत आश्रय घेऊन राहणाऱ्या ज्येष्ठांना या अन्नाचा लाभ झाला, तर तोदेखील ज्येष्ठांसाठी चांगला उपक्रम ठरू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com