ढोलताशा पथकांवर 'सुपारी'चा वर्षाव!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

मुंबई - गुलालाची उधळण आणि डीजेच्या तालावर थिरकणारे भाविक दरवर्षी पाहायला मिळतात. मात्र, शांतता क्षेत्रात लाउडस्पीकरवरील बंदीच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असली, तरीही यंदा कर्णकर्कश डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना गणेश मंडळांनी पसंती दिली आहे. त्यामुळे ढोलताशा, लेझीम पथकांवर यंदा "सुपारी'चा वर्षाव झाला आहे.

प्रत्येक ढोलपथकाला दोन किंवा तीन गणेश मंडळांमध्येच सहभागी होणे शक्‍य असल्याने यंदा अनेक पथकांची चांदी झाली आहे. पण मंडळांची संख्या अधिक असल्याने मुंबईत ढोलताशा पथके कमी पडत असल्याची परिस्थिती आहे. यंदा डीजेचा वापर मंडळांनी टाळल्याने ढोलताशा पथकांना मोठी मागणी आहे. सेलिब्रेटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचे आवडते पथक असलेल्या "मोरया' ढोलपथकातील प्रसाद पारकर यांनी सांगितले, की आम्ही वाशीतील दोन मंडळांची सुपारी घेतली आहे. तरीही तब्बल 15 हून अधिक मंडळांनी संपर्क साधला. कोणते तरी ओळखीचे मंडळ सुचवा, बेन्जोही चालेल अशी विनंतीही काही मंडळांनी केली. असाच काहीसा अनुभव मुंबईतील अनेक मंडळांना येत आहे. पूर्वी नवख्या पथकांना सुपारी मिळत नसे; यंदा त्यांनाही मागणी वाढली आहे. श्री सिद्धिविनायक हे वरळीतील ढोलताशा पथक गतवर्षीपासून गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत आहे. गतवर्षी पथक नवे असल्याने आम्ही काही मंडळांमध्ये सुपारी नसतानाही सादरीकरण केले होते. मात्र, यंदा गणेश चतुर्दशीसाठी तब्बल चार ते पाच मंडळांनी आमच्याशी संपर्क साधला, असे विलास परब यांनी सांगितले. या संदर्भात लाउडस्पीकरच्या "पाला' या संघटनेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news dhol tasha pathak in ganpati visarjan