ऑनलाईन पंचनामे शेतकऱ्यांना अवघड; गावस्तरावर पंचनाम्याची मागणी

सुनील पाटकर
Friday, 23 October 2020

रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शेताच्या बांधावरून सायबर कॅफे गाठावे लागणार आहे. कारण अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेले; परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांनी गुगल लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याचे आदेश जिल्हा कार्यालयाने दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होणार असून, थेट गावातच पंचनामे करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

महाड : रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शेताच्या बांधावरून सायबर कॅफे गाठावे लागणार आहे. कारण अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेले; परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांनी गुगल लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याचे आदेश जिल्हा कार्यालयाने दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होणार असून, थेट गावातच पंचनामे करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

ऑक्‍टोबर महिन्यात रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अजूनही सायंकाळच्या सुमारास पावसाच्या सरी येत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागचा ससेमिरा संपलेला नाही. अनेक गावांत भातपिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत. परंतु अनेक गावांत अद्यापही सरकारी यंत्रणा पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे आता ऑनलाईन पंचनामे होणार आहेत. 

सविस्तर वाचा : नागपूरची संत्री एपीएमसीमध्ये दाखल! किरकोळ बाजारात चढ्या दरात विक्री

ज्यांचे पंचनामे झाले नाहीत, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनीच https://docs.google.com/forms/d/1W944r3a8eXfK_H8V8zEiOhl7vLDHr8I4pvqLm93... या गुगल लिंकवर नुकसानीचा अर्ज भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. सध्या अनेक गावांत इंटरनेट सुविधा नाही. सर्वच शेतकऱ्यांकडे मोबाईल सुविधा नाही. काहींना असे अर्ज भरता येणे शक्‍य होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना शहरात सायबर कॅफेत येऊन असे अर्ज भरावे लागणार आहेत. यात शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाया जाणार आहे. गावातील ऑनलाईन शिक्षणासारखी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. यामुळे शेतकरी नुकसानीपासून वंचित राहू शकतो. यासाठी गावस्तरावर पंचनामे व्हावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

वाचा हेही : पनवेल ग्रामीणमध्ये कोरोना आटोक्यात; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

शेतीची कामे अजून संपलेली नाहीत. सरकारने ऑनलाईन अर्ज भरून घेण्यापेक्षा ग्रामपंचायत पातळीवर थेट पंचनामे केल्यास शेतकऱ्यांना सोयीचे होईल. 
- टी. एस. देशमुख, अध्यक्ष, किसान क्रांती संघटना 

 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers whose panchnama has not been completed are ordered to fill up the online application