सिडकोच्या 'त्‍या' सहा अधिकाऱ्यांवर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल

सुजीत गायकवाड : सकाळ वृत्तसेवा 
Monday, 10 August 2020

सिडकोतील विकास अधिकारी भरत ठाकूर यांच्या तोंडाला शाई लावणे सहा अधिकाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आहे. ठाकूर यांनी त्यांच्या तोंडाला काळे लावणाऱ्या सिडकोच्या या अधिकाऱ्यांविरोधात सीबीडी-बेलापूर पोलिस ठाण्यात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, सिडको प्रशासनानेही या अधिकाऱ्यांविरोधात दक्षता समितीमार्फत विभागीय चौकशी सुरू केली आहे. सध्या या आरोपींनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. 

नवी मुंबई : सिडकोतील विकास अधिकारी भरत ठाकूर यांच्या तोंडाला शाई लावणे सहा अधिकाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. ठाकूर यांनी त्यांच्या तोंडाला काळे लावणाऱ्या सिडकोच्या या अधिकाऱ्यांविरोधात सीबीडी-बेलापूर पोलिस ठाण्यात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, सिडको प्रशासनानेही या अधिकाऱ्यांविरोधात दक्षता समितीमार्फत विभागीय चौकशी सुरू केली आहे. सध्या या आरोपींनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. 

ठाकूर यांनी सीबीडी-बेलापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, 2019 ला भरत ठाकूर हे सिडकोच्या सामान्य प्रशासन विभागात विकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्या विभागात काम करणारे सहायक विकास अधिकारी मयूर आगवणे यांनी मे 2019 ला आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ठाकूर यांनी त्याला मानसिक त्रास दिल्यामुळे आगवणे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर करून सिडको कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी नीलेश तांडेल, विनोद पाटील, यतिश पाटील, विकास मुकादम, अतिम म्हात्रे आणि जे. टी. पाटील यांनी ठाकूर यांच्या तोंडाला शाई लावली. त्यानंतर अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ करत पुन्हा सिडको कार्यालयात न येण्याची धमकी दिली. ठाकूर यांनी सर्वांना समजावण्याचे प्रयत्न केले होते; मात्र त्यांचे कोणीही ऐकू न घेता शिवीगाळ व मारहाण केली. 

गणेशोत्सवाच्या अगदी आदल्या दिवशीही एसटीने कोकणात जाता येणार, अट मात्र एकच...

यानंतर ठाकूर यांनी शाई फासणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सिडको प्रशासनाकडे केली होती. सिडको व्यवस्थापनाने त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी उलट भरत ठाकूर यांची एक महिन्याने औरंगाबाद कार्यालयात बदली केली. 26 फेब्रुवारी 2020 ला औरंगाबादहून ठाकूर यांची पुन्हा सिडकोच्या नवी मुंबई कार्यालयात बदली झाली. तेव्हा ठाकूर यांनी सहा जणांवर केलेल्या कारवाईबाबत विचारणा केली असता, सिडकोने कोणतीच कारवाई न केल्याची बाब समोर आली. तेव्हा ठाकूर यांनी स्वतःला न्याय मिळण्यासाठी सीबीडी-बेलापूर पोलिस ठाण्यात धाव घेत सहा जणांविरोधात जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि धमकावल्याबाबत ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. 

या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सहा आरोपींना अद्याप अटक केलेली नाही. लवकरच त्‍यांना अटक होईल. 
- भरत गाडे, सहायक पोलिस आयुक्त 

गणेशोत्सवासाठी रायगड जिल्ह्यात जाताय? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची

सिडकोवर कर्मचारी संघटनांचा दबाव 
सिडकोतील कर्मचाऱ्यांच्या मक्तेदारीमुळे सिडको प्रशासनावर कर्मचारी संघटनांचा नेहमी दबाव राहिला आहे. अनेकदा या दबावाचा वापर काही संघटना स्वतःच्या फायद्यासाठी करत असतात. विकास अधिकारी भरत ठाकूर यांच्या तोंडाला शाई लावणारे युनियनचे पदाधिकारी आहेत. या युनियनची गेली अनेक वर्षांपासून निवडणूकही झालेली नाही. या पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे भरत ठाकूर यांनी मागणी करूनही सिडको व्यवस्थापनाला त्यांची चौकशी करण्याची हिंमत झाली नाही. ठाकूर यांनी जेव्हा पोलिसांत धाव घेतली, तेव्हा सिडकोच्या दक्षता समितीमार्फत चौकशी केली जात असल्याचे दाखवले जात आहे. मात्र, ठाकूर यांना शाई लावल्याच्या प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीत या सहा अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती दक्षता समिती मुख्य अधिकारी निसार तांबोळी यांनी दिली. 

व्यवसायाचे आर्थिक गणित बिघडलेे; सणासुदीच्या काळात ग्राहकांनी फिरवली पाठ

एका माजी मंत्र्याची मदत 
सिडकोतील अधिकारी भरत ठाकूर यांना शाई लावणाऱ्या सहा अधिकाऱ्यांना नवी मुंबई शहरातील एका माजी मंत्र्याची मदत होत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे. सध्या याच मंत्र्याच्या आदेशानुसार प्रकरण दाबण्यासाठी पैसे गोळा करण्याचे काम सुरू आहे. हे पैसे गोळा करण्याचे काम सिडकोचे कामकाज करणाऱ्या एका दलालावर सोपवण्यात आले आहे. 
 

संपादन : उमा शिंदे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed Atrocity charges on Six officer of Cidco