स्टंटबाजी करता, मग मृतदेह झाडावर लटकेल... कुठे घडली अशी घटना...

स्टंटबाजी करता, मग मृतदेह झाडावर लटकेल... कुठे घडली अशी घटना...

अलिबाग : नदी-नाल्यात पट्टीचे पोहणारे कोकणात पदोपदी सापडतात. पावसाळ्यात ओथंबून वाहणाऱ्या नद्यांमध्ये स्टंडबाजी दाखवण्यासाठी ते जणू आतूर झालेले असतात; परंतु अक्राळ रूप धारण केलेल्या पाण्यामध्ये कोणाचेही चालत नसल्याने अनेक वेळा अशा प्रकारची स्टंटबाजी अंगाशी येऊन जीव गमवावा लागतो. अशीच घटना अलिबाग तालुक्‍यातील नवघर येथे दिवीपारंगी खाडीकिनारी घडली. स्टंटबाजी दाखवताना पुराच्या पाण्यात सहा दिवसांपूर्वी वाहून गेलेले रामराज येथील अजित दिनानाथ चिखले या 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी दुपारी 3 वाजता एका झाडावर आढळून आला आहे.

5 ऑगस्ट रोजी आलेल्या पुरात स्टंटबाजी दाखवताना वाहून गेल्याची अशा प्रकारची जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. अजब म्हणजे, वाहून जाताना या दोन्ही घटनांचे व्हिडीओ शूटिंगही करण्यात आले आहे; पण कोणालाही त्यांना वाचवता आलेले नाही. नवघर येथे वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध रेवदंडा पोलिस आणि स्थानिक नागरिक घेत होते.

पाणी ओसरल्यानंतर पाच दिवस शोधमोहीम राबवण्यात आली होती; परंतु जमिनीवर, बाजूच्या झाडी-झुडपात शोधताना उंचावर अडकलेल्या मृतदेहाकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. याबाबत माहिती देताना अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले की, पुरात मृत्युमुखी पडलेले अजित चिखले हे पट्टीचे पोहणारे होते. दरवर्षी ते पुराच्या पाण्यातून सहीसलामत बाहेर पडत असत. बुधवारी दुपारी 3.15 वाजता याच आत्मविश्वासाने त्यांनी नवघर पुलावरून पुरात उडी मारली, हीच उडी त्यांची अखेरची ठरली. 

अशाच प्रकारची घटना म्हसळा शहराला लागून वाहणाऱ्या जानसई नदीला आलेल्या पुराच्या दरम्यान घडली होती. मित्रांसोबत स्टंटबाजी करताना बदर हलदे या 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. 

(संपादन : उमा शिंदे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com