Maratha Kranti Morcha: महाड पोलादपूरमध्ये मुंबई गोवा महामार्गावर चक्का जाम

सुनील पाटकर
Thursday, 9 August 2018

महाराष्ट्र बंदच्या हाकेमुळे शहरातील रस्ते ओस पडले होते. तर एसटी व विक्रम रिक्षा बंद असल्याने रस्त्यावर वाहनेही दिसत नव्हती. आंदोलनानंतर मराठा समाजाने अवयवदानासाठी फॉर्म भरुन सामाजिक योगदानही दिले.

महाड - एक मराठा लाख मराढाच्या घोषणा देत  मराठा आरक्षणाच्या मागणी साठी सकल मराठा समाजाच्या वतीने महाडमध्ये आज मुंबई गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर बंदचे आवाहन केलेले नसतानाही महाडमधील व्यापाऱ्यांनी स्वखुशीने आपली दुकाने बंद ठेवल्याने शहरात शुकशुकाट होता. महाराष्ट्र बंदच्या हाकेमुळे शहरातील रस्ते ओस पडले होते. तर एसटी व विक्रम रिक्षा बंद असल्याने रस्त्यावर वाहनेही दिसत नव्हती. आंदोलनानंतर मराठा समाजाने अवयवदानासाठी फॉर्म भरुन सामाजिक योगदानही दिले.

संपूर्ण महाराष्ट्रात 9 ऑगस्टला चक्का जाम आंदोलन करण्याचा ईशारा मराठा समाजाने दिल्याने महाडमध्येही याला प्रतिसाद मिळाला. मुंबई गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलन करुन दोन तास महामार्ग रोखण्यात आला.या वेळी महाडचे आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप, नायक मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष सुभाष निकम, राव मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष डॉ. चेतन सुर्वे, देशमुख मराठा समाजाचे अध्यक्ष अॅड. विनोद देशमुख उपस्थित होते. सकाळी अकरा पासुन समाजाचे कार्यकर्ते महामार्गावर ठाण मांडून बसले होते. अधूनमधून पावसाच्या सरी आल्या तरीही आंदोलकांचा उत्साह कायम होता. शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. रस्त्यावर बसणारे विक्रेतेही आज बसले नाहीत. या बंदचे पडसाद सर्वत्र उमटल्याने महामार्गावर सकाळपासून एकही वाहन फिरकले नाही.

संपूर्ण महामार्ग व शहरातील प्रमुख रस्ते ओस पडले होते. शहरात विक्रम रिक्षांमुळे होणारी ग्रामिण भागातील वर्दळ थंडावली होती. विक्रम व एसटी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. महाड आगारतून आज एकही गाडी सुटली नाही. त्यामुळे अनेक प्रवासी ताटकळत बसले नाहितर परत गेले. शहरी व ग्रामीण भागातील शाळा बंद होत्या. शाळेत येणारी मुले व स्कूल बस बंद असल्याने मुले शाळेकडे फिरकली नाहीत. बँका व पतसंस्थेची कार्यालये सुरु असली तरी व्यवहार मात्र थंडावले होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाटी उपस्थितांनी आपली मते व्यक्त केली. यात राजकिय राजकीय टिकाटिप्पणीही करण्यात आली. या आंदोलनाच्या ठिकाणी  माजी आमदार माणिक जगताप यांनी राज्यातील मराठा समाजाचे आमदार राजीनामा देत असताना कोकणातील मराठा आमदार गप्प का? असा सवाल केल्यानंतर या मराठा समाजाच्या आशीर्वादाने आपण आमदार झालो त्या समाजास अत्यावश्यक असलेले आरक्षण आपल्या राजीनाम्याने मिळणार असेल तर आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्यास आपण तयार असल्याच आमदार भरत गोगावले यांनी स्पष्ट केले. मोर्चाचे औचित्य साधून रोटरी क्लब महाडने हाती घेतलेल्या अवयवदानाच्या कार्यात या आंदालनाचा सहभाग लाभला. मराठा समाजानेही अवयवदानासाठी फॉर्म भरुन सामाजिक योगदानही दिले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Bandh Chakka Jam at mumbai goa highway mahad