
सकाळी एसटी बस चालू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व काम धंद्यासाठी आलेले प्रवाशी मुरबाड येथे आले. परंतु मराठा समाजाचे तरुण एकत्र येताच बस बंद करण्यात आल्या.
मुरबाड (ठाणे) : मराठा आंदोलनाचा धसका घेऊन एस टी बस बंद केल्याने गुरुवारी मुरबाड मध्ये प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.
सकल मराठा मोर्चाच्या तरुणांनी मुरबाड शहरात रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. आमदार किसन कथोरे यांनी शिवाजी चौकात रॅली मधील कार्यकर्त्यांना भेटून चर्चा केली. त्यानंतर रॅली तहसीलदार कार्यालयात आली. तेथे नायब तहसीलदार हनुमंत जगताप यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले. यावेळी बाजार पेठेत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. दुपार नंतर काही दुकाने उघडली.
सकाळी एसटी बस चालू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व काम धंद्यासाठी आलेले प्रवाशी मुरबाड येथे आले. परंतु मराठा समाजाचे तरुण एकत्र येताच बस बंद करण्यात आल्या. मुरबाडमधील काही खाजगी शाळांनी शाळा बंद ठेवल्या होत्या. तर शिक्षक संपावर असल्याने ग्रामीण भागातील शाळांत विद्यार्थी फिरकले नाहीत.
शासकीय कर्मचाऱ्यांचा संप, मराठा मोर्चाचा बंद व जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुरबाड शहरात आलेले शेकडो आदिवासी बांधव यामुळे पोलिस यंत्रणेवर बंदोबस्ताचा मोठा ताण होता. त्यासाठी एसआरपीची तुकडी व इतर पोलिस ठाण्यातून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता. पोलिस उप अधीक्षक राजेंद्र मोरे, पोलिस निरीक्षक अजय वसावे स्वतः बंदोबस्तासाठी हजर होते.
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.