परदेशात नोकरीचे प्रलोभन दाखवून गंडा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

Scandalous by the temptation of a job abroad

मुंबई : परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे प्रलोभन दाखवून नागरिकांना गंडा घालणाऱ्या एका टोळीच्या मुसक्‍या आवाळण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. मशीद बंदर येथील पटवा मेन्शन या इमारतीत धाड टाकून या टोळीतील काही जणांना अटक करण्यात आली. ही टोळी त्यांच्या जाळ्यात अडकणाऱ्या व्यक्तींच्या पासपोर्टवर कुवेत देशाचा बनावट व्हिसा शिक्‍काही मारून देत होती.

या टोळीतील अक्रम शेख (47) आणि शब्बीर अकबर ऊर्फ मुन्ना (51) या दोघांना आज पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. बिहार, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, ओरिसा या राज्यांत या टोळीमार्फत अनेकांना गंडा घालण्यात आला आहे.

धारावी येथे राहणारे जाहिद कासीम खान (37) याला या टोळीने आखातातील देशात नोकरी लावून देतो असे प्रलोभन दाखवले होते. याला बळी पडून खान याने हजारो रुपये या टोळीतील शेखला दिले; मात्र या टोळीकडून केवळ आश्‍वासने मिळत राहिल्याने कंटाळलेल्या खान यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी या टोळीच्या कार्यालयावर धाड टाकून दोन आरोपींसह दोन संगणक, 12 प्रिंटर, 79 पासपोर्ट, 30 कुवेत व्हिसाचे फोटोप्रिंट, चार रबरी शिक्के जप्त केले आहेत. कार्यालय भाड्याने घेऊन ही टोळी अनेकांना जाळ्यात अडकवत होती. अटक करण्यात आलेल्या दोघांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रत्येकाची 75 हजार रुपयांची फसवणूक 
ही टोळी परदेशात पाठवण्याच्या नावाखाली प्रत्येकाडून 70 ते 75 हजार रुपये उकाळत असे. निम्मे पैसे आल्यावर पासपोर्टवर संबंधित देशाचा व्हिसा चिकटवून ते छायाचित्र त्याला पाठवण्यात येत असे. त्यानंतर उरलेले पैसे वसूल करण्यात येत असत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: मशीद बंदरमधून टोळीला अटक