एक नंबर! एकाचवेळी 'इतक्या' कर्करोग रुग्णाची कोरोनावर मात, वरळीतील एनएससीआय केंद्रात सुरु होते उपचार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयातून कर्करोग आणि कोरोना अशा दोन्ही आजारांशी झुंजणा-या 178 रुग्णांना आतापर्यंत एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये उपचार देण्यात आले असून त्यापैकी 126 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मुंबई - परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयातून कर्करोग आणि कोरोना अशा दोन्ही आजारांशी झुंजणा-या 178 रुग्णांना आतापर्यंत एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये उपचार देण्यात आले असून त्यापैकी 126 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोविड बाधित एकही कर्करुग्ण दगावलेला नसून फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगात हे दुर्मिळ असे उदाहरण म्हणावे लागेल, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. 

कोरोनाचा सामना करताना ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ती खालावते, त्यांच्या जिवाला धोका असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे अशा रुग्णांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार याची खबरदारी मुंबई महापालिका घेत आहे. गेल्या २० दिवसांत मुंबईत कोविड बाधित एकाही डायलिसिस रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, अशा रुग्णांसाठी पालिकेने स्वतंत्र केंद्र, स्वतंत्र संयंत्रे नेमून दिलेली असून त्याचे सुयोग्य व्यवस्थापन केले आहे. आता कर्करुग्णांच्या बाबतीतही विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे पालिकेने म्हटले आहे. 

BIG NEWS - 15 जूनपासून पुन्हा कडक लॉकडाऊन ? यावर CMO ने केलं ट्विट, मुख्यमंत्री म्हणतात...

एका अंदाजानुसार, जगभरात कर्करुग्णांमध्ये कोरोनाची लागण झाल्यास त्यांतील मृत्युंचे प्रमाण हे तब्बल ५० टक्के इतके आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये हा अनुभव आला आहे. कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार,कोरोनाची बाधा झालेल्या कर्करोग ग्रस्तांना सर्वसाधारण कोरोना उपचार केंद्रांमध्ये एकत्रित ठेवता येत नाही, त्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागते. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेने वरळी येथील नॅशनल स्पोर्टस्‌ क्लब ऑफ इंडिया येथे विकसित केलेल्या डोम कोरोना काळजी केंद्रात कर्करुग्णांसाठी विशेष व्यवस्था केली आहे.

मुंबईत परळ येथील प्रसिध्द टाटा रुग्णालयात देशभरातून कर्करोगांनी ग्रस्त  उपचारांसाठी येतात. कर्करुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती स्वाभाविकच खालावलेली असते. त्यात कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या जीविताला धोका पोहोचू नये, यासाठी महापालिकेने टाटा रुग्णालयाला मदतीचा हात दिला आहे. तेथील कोविड बाधित कर्करुग्णांना डोम कोरोना केंद्रामध्ये आणून उपचार केले जात आहेत.

BIG NEWS -  इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियाविरोधात जारी होणार रेड कॉर्नरसाठी नोटीस? वाचा काय आहे प्रकरण

टाटा रुग्णालयातून डोम कोरोना केंद्रामध्ये आलेल्या कोविड बाधित कर्करुग्णांमध्ये अवघ्या २ वर्ष वयाच्या चिमुरड्यापासून ते ७७ वर्ष वयापर्यंतच्या वृद्ध रुग्णाचा समावेश आहे. देशभरातून आलेल्या रुग्णांसह एक विदेशी नागरिकही त्यात आहे. दाखल रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण ५० वर्ष वयावरील आहेत. 

आतापर्यंत एकूण १७८ कोरोना बाधित कर्करुग्ण डोम कोरोना केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल झाले. यापैकी १२६ जणांना यशस्वी उपचार देऊन, कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. यामध्ये एका विदेशी नागरिकाचाही समावेश आहे. तर ५२ जणांवर उपचार सुरु आहेत. यातील एकही रुग्ण सुदैवाने दगावला नसून ही अत्यंत दुर्मिळ बाब ठरली असल्याचा पालिकेने म्हटले आहे. कोरोना बाधित कर्करुग्णांच्या  १० नातेवाईकांवर देखील यशस्वी उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले. तर ४ नातेवाईकांवर सध्या उपचार सुरु आहेत.

126 cancer patients who were detected corona positive tested negative


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 126 cancer patients who were detected corona positive tested negative