मॉलमधील अनधिकृत दुकानांवर हातोडा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

मॉलमधील अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्याची मागणी अनेक नगरसेवकांनी केली. त्यानुसार मॉलची तपासणी करून 15 दिवसांत कारवाई करण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुले यांना दिला. 

ठाणे : शहरातील अनेक नामांकित मॉलमधील मोकळ्या जागेत अनधिकृत दुकाने थाटण्यात आली आहेत. अग्निशमन दलाच्या नियमानुसार अशी दुकाने सुरू करता येत नाहीत. त्याचबरोबर शहरातील अनेक "बॅंक्वेट हॉल'मध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ एकच दरवाजा असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबतच्या तक्रारी सोमवारी (ता. 20) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आल्या. त्यानंतर हे मॉल व "बॅंक्वेट हॉल'वर 15 दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे उत्तर प्रशासनाने दिले. 

महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मॉलला "ओसी' (भोगवटा प्रमाणपत्र) मिळाल्यानंतर रिकाम्या जागेचा सर्रास व्यापारी वापर होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. महापालिकेच्या शहर विकास विभागाने नकाशा मंजूर केल्यानंतर मॉलमधील मोकळ्या जागेचा व्यापारी वापर करता येतो का? या जागेसाठी मालमत्ता कर आकारणी करण्यात येते का, असे प्रश्‍न त्यांनी विचारले. महापालिकेकडून अशी करआकारणी होत असल्यास मॉलमध्ये नियमानुसार बंधनकारक असलेल्या मोकळ्या जागा शिल्लक राहणार नाहीत असे त्या म्हणाल्या. 

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी या हेतूने तपासणी करून अशा व्यापारी जागेवर कर आकारणी करण्यात येते, अशी माहिती उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. महापलिकेने नकाशा मंजूर केल्यानंतर झालेले अतिरिक्त बांधकाम अनधिकृत ठरवले जाते. या बांधकामांवर कारवाई करण्यात येईल, असे शहर विकास विभागाचे अधिकारी नितीन येसुगुडे यांनी सांगितले. मॉलमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोकळ्या जागा ठेवणे बंधनकारक आहे. या मोकळ्या जागेतील बांधकामे नियमबाह्य आहेत, असे सभागृह नेते अशोक वैती म्हणाले. अशा जागांचा व्यापारी वापर आणि बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. 

ही बातमी वाचा ः घरातले झोपेत असताना तो बाथरूम मध्ये गेला आणि..
मॉलमधील अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्याची मागणी अनेक नगरसेवकांनी केली. कारवाईची वेळ आल्यावर शहर विकास विभाग, अतिक्रमण विभाग अथवा अग्निशमन दल एकमेकांकडे बोट दाखवतात; या तिन्ही विभागांनी एकत्रित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार मॉलची तपासणी करून 15 दिवसांत कारवाई करण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुले यांना दिला. 

"बॅंक्वेट हॉल'ची तपासणी 
शहरातील "बॅंक्वेट हॉल'मध्ये अग्निशमन दलाच्या नियमानुसार दोन दरवाजे आणि दोन स्वतंत्र जिने असणे आवश्‍यक आहे, परंतु काही "बॅंक्वेट हॉल' इमारतीच्या गच्चीवर सुरू करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी एकच मार्ग असल्याने आगीसारखी दुर्घटना घडल्यास नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. या ठिकाणी अन्न शिजवले जात असल्याने आगीची भीती असते. अग्निशमन दलाचे नियम पायदळी तुडवले जात असल्यास जबाबदार कोण, अशी विचारणा करण्यात आली. या "बॅंक्वेट हॉल'ची तपासणी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 days action against unauthorized shops in mall