दिवाळीनंतरचे १५ दिवस अतिशय महत्त्वाचे; मुख्यमंत्र्यांकडून मास्क वापरण्याचं आवाहन

पूजा विचारे
Sunday, 8 November 2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी जनतेला प्रदूषण करणारे फटाके टाळण्याचे आवाहन केलं आहे. फटाकेबंदीच्या निर्णयाऐवजी त्यांनी हे नागरिकांना आवाहन केलंय.

मुंबईः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी जनतेला प्रदूषण करणारे फटाके टाळण्याचे आवाहन केलं आहे. फटाकेबंदीच्या निर्णयाऐवजी त्यांनी हे नागरिकांना आवाहन केलंय. तसंच महाराष्ट्रात कोरोनाचा प्रार्दुभाव बऱ्यापैकी आटोक्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतोय. म्हणूनच या दिवाळीत फटाके न फोडण्याचा स्वतः संकल्प करा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.  त्यामुळे आपण आतापर्यंत केलेली सगळी मेहनत वाया जाईल. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालण्याऐवजी नागरिकांनी स्वत:वरच काही बंधने घालून घ्यावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आपण सर्व सण साधेपणाने साजरे केले. सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. नागरिकांच्या सहकार्यामुळे आज आपण थोडेसे तणावमुक्त आहोत, असंही ते म्हणालेत. 

पुढे ते म्हणाले की,  फटाक्यांवर बंदी आणता येईल, परंतु स्वत:हुन आपण बंधन घालून घेऊ शकतो का? अनेकजण म्हणतात तुम्ही बोलताना कुटुंबप्रमुखासारखे, मोठ्या भावासारखे वाटता, मग त्या नात्याने मी विनंती करतो. फटाकेबंदी पेक्षा प्रदूषण करणारे फटाके टाळा. 

अधिक वाचाः  दिवाळीनंतरचे १५ दिवस अतिशय महत्त्वाचे; मुख्यमंत्र्यांकडून मास्क वापरण्याचं आवाहन

अनेक ठिकाणी आकडा शून्यावर येऊन पाश्चिमात्य देशात परत वाढला. इटली, इंग्लंड, स्पेन अनेक देश पाहा. काही ठिकाणी तर घरातही मास्क घालणे बंधनकारक आहे. परत लॉकडाऊन केला आहे. दुसरी लाट ही लाट नाही त्सुनामी आहे. आपल्याकडे होणार नाही, होऊ द्यायचं नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल. त्यासाठी घाई करून चालणार नाही. पहिल्यांदा आपल्याला मंदिरे सुरु करण्यासंदर्भातील नियमावली तयार करायला पाहिजे. नाहीतर मंदिरात तासनसात नामस्मरणात तल्लीन राहणाऱ्या आपल्या घरातील ज्येष्ठांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.  तसंच  मंदिरे उघडत नाही म्हणून अनेकजण माझ्यावर टीका करत आहेत. मला तुम्हा सगळ्यांची काळजी असल्यामुळे मंदिरे उघडण्याचा निर्णय योग्यवेळीच घेतला जाईल, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.

अधिक वाचाः  आर्थिक भार दूर करण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनियर उतरला ड्रग्स व्यवसायात

कोरोनाच्या काळात महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी राज्याची बदनामी करण्याचे कारस्थान केले. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली, असा गैरसमज त्यांच्याकडून पसरवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र द्वेष्टे हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरत आहे. या इतक्या बदनामीनंतरही आपल्या महाराष्ट्राने जून महिन्यात नव्या उदयोगधंद्यांशी 17 हजार कोटींचे करार केले. हे करार केवळ कागदावर राहणार नसून प्रत्यक्षात येतील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

15 days after Diwali is very important Chief Minister appeals to use mask


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 days after Diwali is very important Chief Minister appeals to use mask