एका कोरोना बाधिताच्या संपर्कात 16 व्यक्ती; मुंबईतील रूग्णसंख्यावाढी मागील प्रमुख कारण आले समोर

मिलिंद तांबे
Friday, 18 September 2020

एका कोरोना बाधिताच्या संपर्कात साधारण 16 अतिजोखमीचे संपर्क  येतात, अशी माहिती समोर आली आहे.

मुंबई : एका कोरोना बाधिताच्या संपर्कात साधारण 16 अतिजोखमीचे संपर्क  येतात, अशी माहिती समोर आली आहे. त्यातील सुमारे 5 टक्के व्यक्तींना कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करावे लागते. मुंबईतील रूग्णसंख्यावाढी मागील हे एक प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय चाललंय काय? कोरोना काळातही स्वायत्त महाविद्यालयांकडून नियमबाह्य शुल्क वसूली; मनसेचा उच्च शिक्षणमंत्र्यांना पत्र 

मुंबईतील वाढता कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून कोरोना चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. दिवसाला साधारणता 15 हजार चाचण्या केल्या जातात. त्यात सुमारे 7 हजार अँटीजेन आणि 7 हजार उर्वरीत आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातात. त्यानंतर पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात येणा-या अतिजोखमीच्या व्यक्तींचा पालिकेकडून शोध घेण्यात येतो. त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार एका रूग्णाच्या संपर्कात साधारणता 16 व्यक्ती येत असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले. 

मुंबईत 24 तासांत सरासरी 2 हजार रुग्ण सापडतात. त्या बाधित रूग्णांच्या संपर्कात 24 तासात 16 हजार व्यक्ती येतात. त्यातील 2 हजार व्यक्तींना खबरदारी म्हणून कोव्हिड केअर सेंटर मध्ये दाखल केले जाते. गेल्या आठवड्याभरात बाधित व्यक्तीच्या संपर्कात 1 लाख 4 हजार 669 अतिजोखमीचे संपर्क समोर आले. त्यातील साधारणता 5 टक्के म्हणजे 18,508 व्यक्तींना कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले. एका कोरोना बाधिताच्या संपर्कात साधारण 16 अतिजोखमीचे संपर्क  येतात, अशी माहिती समोर आली आहे. 

अतिजोखमीच्या बहुतांश व्यक्तींना कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळत नाहीत. या व्यक्ती घरात, कार्यालयात किंवा इतर ठिकाणी बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या असतात. मात्र खबरदारी म्हणून या व्यक्तींना होम क्वरांटाईन केले जाते. तर ज्या व्यक्तींना काही सौम्य लक्षणे किंवा दीर्घकालिन आजार असतात अशा व्यक्तींना कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते.

मुंबईकरांची कडक उन्हामुळे होरपळ? तर जाणून घ्या ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील वातावरणाची स्थिती

मास्क न घातल्याने धोका
अनलॉक 4 नंतर नागरिक मोठ्या संख्येने घरातून बाहेर पडत आहेत. मात्र अनेक जण मास्क न लावता बाहेर फिरतांना दिसतात. अशा व्यक्तींमुळे  15 दिवसांपासून मुंबईतील बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळे मास्क शिवाय बाहेर फिरणा-या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

अतिजोखमीचे संपर्क म्हणजे काय?
पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात 20 मिनिटांपेक्षा अधिक वेळ असणा-या व्यक्तींना अतिजोखमीचे संपर्क म्हणून गणले जाते.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 persons in contact with a corona infection