घर देता का घर...

घर देता का घर...

पनवेल : पंडित दीनदयाळ नागरी उपजीविका अभियानांतर्गत पालिका हद्दीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १६९ बेघर आणि निराधार व्यक्ती राहत असल्याचे आढळून आले आहे. सध्या सुरू असलेल्या थंडीच्या लाटेत टिकून राहण्यासाठी पनवेल शहरात अशा बेघर नागरिकांकरिता बेघर होम सुरू करणे गरजेचे झाल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

नॅशनल अर्बन लाइव्हलीहुड मिशनच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक भागात १०० लोकांमागे एक आश्रयस्थान तसेच प्रत्येक व्यक्तीसाठी ५० चौरस फूट जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जेणेकरून जागेअभावी रस्त्यावर झोपणाऱ्यांची सोय होऊ शकेल. पालिकेमार्फत शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील नवनाथ नगर भागात बेघरांकरिता बेघर होम सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी केवळ १८ बेघर राहू शकतील इतकीच जागा उपलब्ध होती.

नोव्हेंबर २०१९ मध्ये या बेघर होमची व येथे वास्तव्यास येणाऱ्या बेघर नागरिकांची काळजी घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या संस्थेचा कार्यकाळ संपुष्टात आला. सध्या या ठिकाणी पालिकेने कारवाई करून तोडलेल्या झोपडपट्टीमधील नागरिक वास्तव्य करत असल्याने नव्या संस्थेची नेमणूक करण्याकरिता निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असल्याने हे आश्रयस्थान बंद ठेवण्यात आले आहे.

पंडित दीनदयाळ नागरी उपजीविका अभियानांतर्गत व्ही मॅक्‍स या संस्थेमार्फत शहरातील रेल्वे स्थानक, एसटी आगार, उड्डाणपूल तसेच पदपथावर रात्रीच्या वेळी झोपणाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १६९ बेघर आढळून आले असून त्यापैकी १०१ बेघरांनी आपली माहिती संस्थेच्या प्रतिनिधींना दिली असून, ६८ नागरिक कोणतीही माहिती संस्थेला देत नसल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

जागेची चाचपणी सुरू
पालिकेमार्फत बेघर नागरिकांना रात्रीचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी नव्या बेघर होमची उभारणी करण्यात येणार आहे. या बेघर होमकरिता जागेची चाचपणी करण्याचे काम पालिकेमार्फत सुरू असल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com