उरणच्या ‘दृष्टी’त ‘स्वच्छ भारत’

सकाळ वृत्‍तसेवा
Monday, 27 January 2020

लघुपट स्पर्धेत पुरस्‍काराने सन्मानित; वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सोहळा उत्‍साहात

उरण : उरणमधील लेखक रोहन घरत यांचा ‘स्वच्छ भारत’ या संकल्पनेवर आधारित ‘दृष्टी’ हा लघुपट सध्या चर्चेत आला आहे. २.५८ मिनिटांच्या लघुपटाला, ‘नवी मुंबई स्वच्छ सर्वेक्षण २०२०’च्या निमित्ताने आयोजित लघुपट स्पर्धेत सन्मानित करण्यात आले. या लघुपटाच्या माध्यमातून अनेकांनी प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे मान्यवरांकडून सांगण्यात आले.

हे पण वाचा :  बदलापुरात साकारणार पुण्याचा ‘शनिवारवाडा’

या प्रसंगी नवी मुंबई महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती नवीन गवते, सभागृहनेता रवींद्र इथापे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले व इतर मान्यवर उपस्थित होते. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या दृष्टीतून स्वच्छ भारताची संकल्पना या लघुपटामध्ये दाखविण्यात आली आहे. स्वच्छता म्हणजे केवळ कचरा साफ करणे नाही; तर मनही स्वच्छ झाले पाहिजे; तरच भारत स्वच्छ होईल, असा विचार यात मांडण्यात आला आहे. केवळ २.५८ मिनिटांचा असलेला हा लघुपट स्वच्छतेबाबत बरेच काही सांगून जातो. या लघुपटाची कथा, संहिता व संवाद रोहन घरत यांनी लिहिले असून दिग्दर्शन व छायाचित्रणाची जबाबदारी हृत्विक चंद्रन, निर्मिती व्यवस्थापन उमेश अहिरे; तर हितेश नायर यांनी अभिनय केला आहे.

हे पण वाचा : खोपोलीतील नाट्यप्रेमींसाठी खूशखबर...

यापूर्वी २०१६ मध्ये केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाच्या प्रमोशनसाठी लघुपट फिल्म फेस्टिवल ठेवले होते. या वेळी या लघुपटाला केंद्र सरकारने ‘एक्‍सलन्स’ प्रमाणपत्राने गौरविले होते. नवी मुंबई पालिकेने आयोजित केलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’च्या निमित्ताने लघुपट स्पर्धेचे आयोजन केले होत. या स्पर्धेसाठी आलेल्या लाघुपटांपैकी ५२ लघुपट स्पर्धेसाठी निवडण्यात आले होते. त्याचा बक्षीस वितरण समारंभ विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी ‘दृष्ठी’ या लघुपटाला सन्मानित करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A short film 'Drishti' based on the concept of 'Swachh Bharat'