मुंबईकरांना दिलासा! नव्या वर्षात सक्रिय रुग्णांच्या संख्येत 17 टक्के घट

भाग्यश्री भुवड
Friday, 22 January 2021

कोरोनामुळे त्रस्त मुंबईकर जणू काही आता रिकव्हरी मोडवर आहेत. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णांचा बरे होण्याचा दर ही वाढला आहे.

मुंबई: कोरोनामुळे त्रस्त मुंबईकर जणू काही आता रिकव्हरी मोडवर आहेत. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णांचा बरे होण्याचा दर ही वाढला आहे. मुंबईतील विविध रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनामधील सक्रिय रूग्णांची संख्या 20 दिवसांत 17 टक्क्यांनी घटली आहे. इतकेच नव्हे तर राज्यात सक्रिय रूग्णांची संख्याही 10.20 टक्क्यांनी घटली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनामुळे बाधित झालेल्यांची संख्येत लक्षणीय घट झाली आहे. यासह जे लोक या आजाराव्यतिरिक्त इतर आजारांनी ग्रस्त आहेत ते देखील लवकर बरे होत आहेत. पालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारीला मुंबईत 8,005 सक्रिय रुग्ण नोंदली गेले होते. जी 20 जानेवारीला घटून 6,654 वर आली. 

राज्यात 1 जानेवारी रोजी 52 हजार 84 रुग्ण सक्रिय होते. ते आता 46 हजार 769 वर आले आहेत. विशेष म्हणजे मुंबईचा रिकव्हरी दर 94 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून संपूर्ण महाराष्ट्रातील पुनर्प्राप्तीचा दर 95 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पालिकेचे उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले की, कोरोनामुळे ग्रस्त असलेल्या रूग्णात गंभीर रूग्णांची संख्या खूपच कमी झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत रुग्ण रिकव्हर देखील लवकर होते. ही एक चांगली बाब आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोविडसाठीचे बेड्स रिक्त

नवीन कोविड रूग्णांची संख्या कमी झाल्याने रुग्णालयात आरक्षित बेड रिक्त पडून आहेत. 1048 व्हेंटिलेटर बेडपैकी 557 बेड रिक्त आहेत. 6,979 ऑक्सिजनसह असलेल्या बेडपैकी 5431 बेड रिक्त आहेत. आयसीयूच्या 1732 बेडपैकी 1010 बेड रिक्त आहेत. तर प्रमुख रुग्णालये आणि जंबो कोविड केअर सेंटरमध्ये 13 हजार 655 पैकी 9 हजार 929 बेड रिक्त आहेत.

किती प्रतिबंधित क्षेत्र

मुंबईच्या झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये 150 प्रतिबंधित क्षेत्र आहेत.  मुंबईतील 2 हजार 244 इमारती अजूनही सीलबंद आहेत. पूर्वी प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या अधिक होती.

रोगाचा प्रसार होऊ देऊ नये यासाठी प्रयत्न

परदेशातून येणार्‍या लोकांचे त्वरित अलगीकरण ठेवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून इतरांना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मुंबईत रुग्ण शोधण्यावर अधिक भर दिला जात आहे. या आजाराची लागण होण्यापासून रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे नवीन प्रकरणेही कमी आहेत आणि सक्रिय रूग्णांची संख्याही कमी आहे.
डॉ. दक्षा शाहा, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

हेही वाचा- PMC Bank Scam: हितेंद्र ठाकुर यांच्या विवा ग्रुपच्या कार्यालयावर EDचा छापा

चांगली बाब

नवीन रूग्णांची घट आणि चांगली रिकव्हरी हे मुंबईसह महाराष्ट्रासाठी चांगले लक्षण आहे. भविष्यात आपण मास्क आणि हातांना स्वच्छ ठेवले पाहिजे याकडे मुंबईकरांनी लक्ष दिले पाहिजे. लस मिळाल्यानंतरही आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
डॉ. राहुल पंडित, सदस्य, कोविड टास्क फोर्स

-------------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

17 percent drop number of Corona active patients new year mumbai news updates


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 percent drop number of Corona active patients new year mumbai news updates