दिलासादायक बातमी! राज्यातील 2 लाख एचआयव्ही ग्रस्तांमध्ये फक्त 'इतके' जण कोरोनाबाधित.. 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

जगभरात धुमाकूळ घालणार्‍या कोरोना विषाणूमुळे अनेकांनी जीव गमावला आहे. तर, देशाच्या इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना बांधितांची संख्या महाराष्ट्रात आहे.

मुंबई: जगभरात धुमाकूळ घालणार्‍या कोरोना विषाणूमुळे अनेकांनी जीव गमावला आहे. तर, देशाच्या इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना बांधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. असे असूनही राज्यातील फक्त 9 एचआयव्हीग्रस्त कोरोना बाधित असल्याची माहीती मिळत आहे.

कोरोना संसर्गातील जोखमीच्या आजारांमध्ये एचआयव्ही संसर्ग मानला जात असूनही एचआयव्हींची कोरोनाबाधितांमध्ये संख्या कमी असल्याने दिलासा मिळत आहे. यातून राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आणि मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीकडून केलेल्या कामात यश मिळत असल्याचेच समोर येत आहे.

ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली नसते अशा रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक परिणाम होतो. डायबिटीस, हायपरटेंशन, किडनीचे विकार, कर्करोग, एचआयव्ही अशा आजारांनी ग्रस्त असलेल्यांना कोरोनाचा सर्वाधिक त्रास होतो. मात्र, राज्य सरकार आणि राज्यभरातील 43 सामाजिक संस्थांच्या मदतीमुळे राज्यातील दोन लाख 17 हजार एचआयव्ही ग्रस्तांपैकी आतापर्यंत फक्त 9 एचआयव्ही रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यातील 6 जण मुंबईतील आहेत. 

हेही वाचा; लॉकडाऊनमधील कौटुंबिक वादांचं होतंय प्रेमात रूपांतर; तब्बल 'इतकं' घटलं वादाचं प्रमाण.. 

मुंबईत 6 एचआयव्ही बाधित रूग्णांना कोरोनाची लागण:

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत 6 एचआयव्ही बाधित रूग्णांना कोरोनाची लागण झाली होती. शुक्रवारी सोसायटीच्या वैद्यकीय डाॅक्टरांकडून दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 6 जण कोरोनाबाधित झाले आहेत. मुंबईत एकूण 39 हजार 800 एचआयव्ही बाधित रूग्ण आहेत. 

मुंबईत 39 हजार 800 एचआयव्ही बाधित रुग्ण आहेत. शुक्रवारी वैद्यकीय डाॅक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, त्या रुग्णांबाबतची आणखी माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. या कोविड काळात मुंबईत आमच्या समोर बरीचशी आव्हाने होती. मात्र, सध्या ती आव्हाने यशस्वी पार झाल्यासारखे वाटत आहे. कित्येकजण वाहतूक बंदमुळे एआरटी सेंटर पर्यंत पोहचू शकत नव्हते. अशा रुग्णाला घरपोच आम्ही औषधे दिली. यासाठी मुंबईतील संस्थेची मदत घेतली आहे. त्यामुळे अतिजोखमेत मोडणारे एचआयव्ही रुग्ण सुरक्षित आहेत. 90 टक्के लोकांच्या शरीरात एचआयव्हीचे कमी विषाणू आहेत. म्हणजेच याचा अर्थ त्यांची रोगप्रतिकारक शक्ती सामान्य व्यक्तींसारखीच आहे. त्यामुळे, इतर लोकांना जशी कोविडची समस्या आहे तशीच त्यांना ही आहे. मात्र, ते एचआयव्ही पाॅझिटीव्ह आहेत म्हणून त्यांची समस्या वाढली आहे अशी किमान मुंबईत परिस्थिती नाही," असं  मुंबई जिल्हा एडस नियंत्रण संस्थेच्या अतिरिक्त प्रकल्प संचालिका डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! सॅनेटाईझर, एन 95 मास्क विक्रीबाबत राज्य सरकार घेणार मोठा निर्णय; वाचा सविस्तर..

"या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एचआयव्हीसह जीवन जगत असलेल्या व्यक्तींना, त्यांच्यासाठी अत्यावश्यक अशी एआरटी (अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट) औषधे त्यांच्या नेहमीच्या एआरटी केंद्रावर जाऊन घेणे कठीण झाले होते. त्यामुळे, वेळेवर औषधे न मिळाल्यामुळे अशा व्यक्तींच्या उपचारामध्ये खंड पडण्याची भीती निर्माण झाली होती. शिवाय, एचआयव्ही संसर्गित रुग्णांमध्ये कोरोनासह आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका अधिक होता. मात्र, महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था आणि राज्यभरातील 43 सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या रुग्णापर्यंत औषध पोहचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील रुग्णाला औषध पोहचवण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, पोलीस प्रशासनाच्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णाला औषध पोहचवणे शक्य झाले. त्यामुळे, गेल्या तीन महिन्यात राज्यात तीन एचआयव्ही/एड्स रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. ते ही घरोघरी जाऊन एचआयव्हीवरील औषधं देत असताना कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एका अमरावतीतील रुग्णाचा समावेश आहे," नेटवर्क ऑफ महाराष्ट्र पीपल लिविंग विथ एचआयव्ही/एड्स पुणे चे संचालक मनोज परदेशी यांनी म्हंटलंय.
 from 2 lac HIV patient only 9 are corona positive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: from 2 lac HIV patient only 9 are corona positive