रायगड पाेलिस तणावग्रस्त?

रायगड पाेलिसांवरील कामाचा ताण वाढलाय
रायगड पाेलिसांवरील कामाचा ताण वाढलाय

अलिबाग : रायगड पोलिस दलातील सहायक निरीक्षक प्रशांत कणेरकर आणि शिपाई मनोज हंबीर यांचा शुक्रवारी एकाच दिवशी मृत्यू झाला. या घटनांमुळे जिल्ह्यातील पोलिसांवरील कामाच्या ताणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. घरफोडी, चोरीसारख्या गुन्ह्यांची वाढती संख्या, अपुरे पोलिस कर्मचारी, कामाचे वाढलेले तास यामुळे पोलिस तणावात आहेत, अशी चर्चा वारंवार झाली आहे.

रायगड जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्येतही वाढ झाली आहे. त्यातूनच गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही महिन्यांपासून घरफोडी आणि चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. दक्षिण रायगडमधील महाडमध्ये तर यामुळे संतापाची लाट आहे. त्यामुळे पोलिसांना गस्त वाढवावी लागली आहे.

2011 च्या जनगणनेनुसार पनवेल आणि उरण तालुका वगळता रायगडची लोकसंख्या सुमारे 20 लाखांपर्यंत आहे. आता त्यामध्ये काही लाखांपर्यंतची वाढ झाली आहे, परंतु अवघ्या दोन हजार 319 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सुरक्षेची जबाबदारी आहे. नियमित बंदोबस्तासह गुन्ह्यांची उकल करताना, त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातूनच कामाचे तास वाढले असल्याने त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

रायगड पोलिस मुख्यालयातील सहायक निरीक्षक प्रशांत कणेरकर यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली; तर शिपाई मनोज हंबीर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनांमुळे पोलिसांचे तणावग्रस्त जीवन अधोरेखित होत असल्याचे समजण्यात येते.

असा आहे फौजफाटा
रायगड पोलिस दलात एक पोलिस अधीक्षक, एक अप्पर अधीक्षक, सात उपविभागीय अधिकारी, 29 निरीक्षक, 26 सहायक निरीक्षक, 31 उपनिरीक्षक, एक राखीव उपनिरीक्षक असा अधिकाऱ्यांचा फौजफाटा आहे. 185 सहायक फौजदार, 536 हवालदार, 429 नाईक, एक हजार 73 शिपाई कार्यरत आहेत. दुसारीकडे 89 उपनिरीक्षक, 15 सहायक निरीक्षक, तीन उपविभागीय अधिकारी, 35 सहायक फौजदार, दोन पोलिस हवालदार, 18 पोलिस नाईक, 67 पोलिस शिपाई यांची पदे रिक्त आहेत.


समाजाचे संरक्षण करताना पोलिस स्वतःची काळजी घेत नाहीत. ते अहोरात्र काम करतात, त्यामुळे त्यांना शारीरिक त्रासाबरोबरच मानसिक त्रासही प्रचंड होतो. त्यातूनच रक्तदाब, लठ्ठपणा यांसारखे आजार होतात. काही व्यसनांच्याही आहारी जातात. मानसिक तणावामुळे पुरेशी झोप मिळत नाही. आता त्यांच्या शारीरिक प्रकृतीबरोबरच मानसिक आजारांवर वरिष्ठ पातळीवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी जागृती करणे आवश्‍यक आहे

- डॉ. अनिल डोंगरे, मनोविकार तज्ज्ञ

समाजाच्या सुरक्षेसाठी पोलिसांना सतर्क राहावे लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्यात येतात. त्यात योगासने आणि अन्य व्यायामाच्या प्रकारांचा समावेश आहे. त्यांच्याबरोबर संवादही साधून अडचणी सोडवण्याचा प्रयत्न पोलिस ठाणे स्तरांवर करण्यात येतो. आरोग्य तपासणीही करण्यात येते.

- अनिल पारसकर, अधीक्षक, रायगड पोलिस


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com