21 ऑगस्टला 'इव्हीएम हटाव' आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

'इव्हीएम-व्हीव्हीपॅट'च्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले असून, 21 ऑगस्टला 'इव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा',चा नारा देत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : 'इव्हीएम-व्हीव्हीपॅट'च्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले असून, 21 ऑगस्टला 'इव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा,लोकशाही वाचवा',चा नारा देत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सर्व पक्षीय पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. 'इव्हीएम'च्या विरोधातील या आंदोलनात भाजप-शिवसेनेने ही यावे. त्यांना जर आपल्या जिंकण्यावर एवढ्या विश्वास असेल तर मग त्यांनी बॅलट पेपरवर निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हानच राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेला दिले.

21 ऑगस्टच्या आंदोलनाच्या इव्हीएमबाबत जनतेकडून नेमक्या काय भावना आहेत, हे जाणून घेण्यासाठी फॉर्म भरून घेतले जाणार आहे. हे फॉर्मनंतर निवडणूक आयोगाला सादर करण्यात येतील, अशी माहितीही राज ठाकरे यांनी दिली. या आंदोलनात कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव किंवा झेंडा नसेल असेही राज म्हणाले.

कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या प्रश्नावर बोलताना राज म्हणाले, की भाजपचे प्रथम लक्ष हे केंद्रात सत्ता स्थापन करणे होते. म्हणून त्यावेळी त्यांनी तसा भास निर्माण केला होता. गेल्या निवडणुकीत 371 मतदार संघामध्ये 55 लाखांहून अधिक मतांचा गोंधळ झाला होता. मुख्यमंत्र्यांना विश्वास असेल तर त्यांनी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यास सहमती दशवावी, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले. ममता बॅनर्जी यांनी याबाबत सहमती दर्शवली असल्याचे ही राज यांनी सांगितले.

यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा धक्का ज्येष्ठ पत्रकार, राजनितीज्ञाना बसला. देशात निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेची जबाबदारी निवडणूक आयोगाची व सरकारची आहे. जनतेने आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From 21st August EVM Hatav agitation will be Start by Opposition Leaders