esakal | हुश्श.. अखेर कोट्याहून 27 विद्यार्थ्यांसह 7 पालक परतले
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नामुळे अडकलेल्या 27 विद्यार्थ्यांसह सात पालकांना सुखरूप आणण्यात आले.

हुश्श.. अखेर कोट्याहून 27 विद्यार्थ्यांसह 7 पालक परतले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अलिबाग : राजस्थानमधील कोटा येथे आयआयटी, मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते. मात्र, लॉकडाऊन घोषित झाल्याने विद्यार्थी तेथेच अडकून होते. पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नामुळे अडकलेल्या 27 विद्यार्थ्यांसह सात पालकांना सुखरूप आणण्यात आले.

मोठी बातमी ः मुंबईत कोरोनाचा धोका वाढतोय.. सील केलेल्या वस्त्यांची संख्या पुन्हा वाढली...

कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. पालकमंत्री तटकरे यांनी  घटनेचे गांभीर्य ओळखून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे याबाबत विनंती केली. तसेच राजस्थान सरकारसोबतही त्यांनी संपर्क साधला. त्यानुसार राजस्थान सरकारने रायगड जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यात आपल्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी दिली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही कोटा येथील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या विद्यार्थ्यांना कोटा येथून रायगडला आणण्याच्या नियोजनाबाबत चर्चा केली. 

मोठी बातमी ः अरे बापरे...राज्यात काही हजार नाही, इतके लाख लोकं क्वारंटाईन... 

14 दिवसांचे होम क्वॉरंटाईन
28 एप्रिलला पहाटेच्या सुमारास कोटा येथून 27 विद्यार्थ्यांसह सात पालकांना  घेऊन निघालेली बस बुधवारी सकाळी 6च्या सुमारास खारघर येथे पोहचली. त्यानंतर सर्वांची वैद्यकीय तपासणी करून होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारला.