#AareyForest आरे आंदोलनप्रकरणी 29 जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

मुंबई मेट्रो 3 साठीच्या कारशेडला आरे कॉलनीमधील
 वृक्षतोडीला विरोध करणार्या 29 जणांना आरे पोलिसांना अटक केली.

मुंबई : मुंबई मेट्रो 3 साठीच्या कारशेडला आरे कॉलनीमधील
 वृक्षतोडीला विरोध करणार्या 29 जणांना आरे पोलिसांना अटक केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यावरणप्रेमींचे आक्रमक आंदोलन पाहता मुंबई पोलिसांनी या परिसरात कलम 144 लागू केले आहे.

मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोड करण्याच्या विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर रातोरात जवळपास 400 झाडांवर कुऱ्हाड चालवली. ही माहिती मिळताच पर्यावरणप्रेमींनी गोरेगाव आरेत धाव घेतली आणि ठिय्या आंदोलन केले. आंदोलन आणि आक्रमक पवित्र्यानंतरही झाडांची कत्तल थांबली नाही. पर्यावरण प्रेमींना न जुमानता पोलिस आणि प्रशासनाने कारवाई केली.

दरम्यान, आंदोलन करणाऱ्या जवळपास 100 जणांना पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील 29 (23 पुरूष व 6 महिला) जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरेचा रस्ताही वाहतुकीसाठी बंद केला. सध्या या परिसरात जाण्यासाठी पोलिसांनी बंदी घातली असून, कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलीस शिपाई इंगळे यांना मारहाण झाल्याचा आरोप असून, त्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 29 जणांविरोधात विरोधात  कलम 353, 332,143, 149 भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 29 Activists Arrested protesting for Mumbai Aarey forest