29 सफाई कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 डिसेंबर 2019

पालिकेच्या ‘रस्ते स्वच्छता’ योजनेतील दोन संस्था बंद

मुंबई : पालिकेतर्फे ‘रस्ते स्वच्छता योजना’अंतर्गत काही खासगी संस्थांकडून रस्त्यांची स्वच्छता केली जाते. याअंतर्गत गोरेगावमधील सहा संस्थांपैकी दोन संस्था नुकत्याच बंद करण्यात आल्या. त्यामुळे या संस्थांमधील जवळपास २९ कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. याविरोधात सफाई कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा इशारा पालिकेला दिला आहे.

सागर सावंत, संदीप सावंत, सचिन पवार, नवनीत जाधव आणि श्रीकांत मोदक यांच्यासह २९ सफाई कर्मचारी ‘राम मंदिर’ आणि ‘आरे विभाग’ संस्थेमध्ये कार्यरत आहेत. संस्था बंद करण्यात आल्याने आमचे कामही थांबवण्यात आल्याचे पालिकेकडून समजले, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. यामधील काही कर्मचारी २००७ पासून कार्यरत आहेत. काम बंद केल्याच्या निषेधार्थ हे कर्मचारी सोमवारी (ता. १७) गोरेगावमधील राम मंदिर विभागात उपोषणास बसण्याच्या तयारीत होते; मात्र पोलिसांनी अशा प्रकारे आकस्मिक उपोषणास मज्जाव केला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा इशारा दिला. अचानक नोकरीवरून काढून टाकल्याने चरितार्थाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आम्ही खासगी कर्मचारी असल्याने मदतीस कोणीही पुढे येत नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

गोरेगावमधील सहापैकी चार संस्थांना दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. उर्वरित दोन संस्थांबाबत आठवडाभरात निर्णय घेऊ. 
- परशुराम कुऱ्हाडे, सहायक अभियंता, घनकचरा व्यवस्थापन, पी दक्षिण कार्यालय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 29 cleaning staff lost job in mumbai