तब्बल 300 मासेमारी नौका बंदरात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

एलईडी आणि पर्ससीन नेट मासेमारीवर सरकारचे निर्बंध आहेत; मात्र त्याची अंमलबजावणी सक्षमपणे होत नसल्याने हे मच्छीमार नाराज आहेत. मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार दहा ते पंधरा वर्षांत बेसुमार मासेमारी झाली. त्यामुळे मासे कमी झाले आहेत. मासेमारीसाठी होणारा खर्च भागेल इतक्‍या प्रमाणार उत्पन्न मिळत नाही. 

अलिबाग  ः एलईडी, पर्ससिन नेट पद्धतीच्या होणाऱ्या बेसुमार मासेमारीमुळे मासळीचा दुष्काळ निर्माण झाला आहे. त्यामुळे खर्च भागवणे कठीण झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून रेवस बंदरातील तब्बल 300 मासेमारी नौका 1 फेब्रुवारीपासून नांगरून ठेवल्या आहेत. 

एलईडी आणि पर्ससीन नेट मासेमारीवर सरकारचे निर्बंध आहेत; मात्र त्याची अंमलबजावणी सक्षमपणे होत नसल्याने हे मच्छीमार नाराज आहेत. मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार दहा ते पंधरा वर्षांत बेसुमार मासेमारी झाली. त्यामुळे मासे कमी झाले आहेत. मासेमारीसाठी होणारा खर्च भागेल इतक्‍या प्रमाणार उत्पन्न मिळत नाही. 

हे वाचा : गणेश नाईकांना धक्का  

बेसुमार मासेमारीमुळे तारली, दाढा, सफेद कोळंबी, नल, तेलबांगडा यांसारख्या मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत. भविष्यात सुमारे 40 मत्स्य प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती धनाजी कोळी, तुळशीबाई कोळी यांनी दिली. 500 कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या रेवस बोडणी परिसरातील सुमारे 300 नौका मासळी दुष्काळामुळे नांगरलेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. आता आंदोलन शिवाय पर्याय नाही, असा इशारा त्यांनी दिला.

पर्ससीन नेट आणि एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटींद्वारे मुंबई ते रत्नागिरी परिसरातील समुद्रात 12 नोटिकलच्या आत आणि बाहेरही बेसुमार मासेमारी सुरू आहे. व्यवसायात मोठे भांडवलदार उतरलेत. त्यामुळे बंदीचा उपयोग होत नाही. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे त्यामुळे संकटात आहेत. 
- अंकुश कोळी, मच्छीमार-बोडणी बंदर 

प्रत्येक फेरीसाठी बर्फ, डिझेल, पगारावर केलेला खर्चही पाण्यात जात आहे. साधारणतः एका फेरीला साडेचार लाख खर्च वाया जात आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली, तर तीव्र आंदोलनाच पवित्रा घेण्यावाचून कोणताच पर्याय उरणार नाही. 
- कमल्या नाखवा, मच्छीमार, रेवस बंदर 

समुद्र ही आमची शेती आहे. ती आयुष्यभर जगवायची आहे. त्यामुळे सरकारने पुढाकार घेऊन कडक पावले उचलायला हवी. बेसुमार मासेमारी सुरू राहिली तर भविष्यात काय, असा प्रश्‍न आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करायची वेळ आली आहे. 
- बळीराम पेरेकर, मच्छीमार, रेवस बंदर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 300 fishing boats have been plowed into the Reavas Port since February 1.