संतापजनक! या कठिण दिवसांमध्येही लाखोंचा मास्क घोटाळा उघड...

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 21 April 2020

  • तळोजात ३२ लाखांचा मास्क घोटाळा
  • दोघा कंपनी अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा

नवी मुंबई : कोरोनामुळे मास्कच्या मागणीत वाढ झाल्याची संधी साधून तळोजा एमआयडीसीतील व्हिनस सेफ्टी अँड हेल्थ प्रा.लि. या कंपनीत काम करणाऱ्या दोघा अधिकाऱ्यांनी कंपनीतील लाखो रुपयांच्या मास्कची परस्पर चढ्या दरात विक्री करून कंपनीची तब्बल 32 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात मास्कची शिलाई करून देणाऱ्या कंत्राटदाराचाही सहभाग असल्याचे आढळून आले आल्याने तळोजा पोलिसांनी या तिघांविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तळोजा एमआयडीसीतील व्हिनस सेफ्टी अँणड हेल्थ प्रा.लि. या कंपनीमध्ये मास्क, गॉगल्स, एअर फ्लग आदी वैयक्तीक सुरक्षा उपकरणे तयार केली जातात. मास्क शिलाईसाठी कळंबोलीतील प्रताप फडतरे याच्या सारिका इंटरप्रायजेसकडे पाठविण्यात आल्यानंतर फडतरे हा शिलाई झालेला माल परत कंपनीत पाठवित असतो. त्यानंतर तयार झालेल्या मास्कच्या मालाची विक्री कंपनीने ठरवून दिलेल्या डिस्ट्रीब्युटरमार्फत केली जाते. गत महिनाभरापासून देशभरात कोविड-19 साथीचा प्रादुर्भाव वाढल्याने मास्क व इतर वैयक्तीक सुरक्षा उपकरणांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे व्हिनस सेफ्टी हेल्थ या कंपनीने मार्चपासून मास्कचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले आहे.  

याचाच फायदा उचलत कंपनीतील प्रोडक्शन अधिकारी आकाश सुरेश ढोबळे व स्टोअर अधिकारी प्रथमेश सखाराम फडके या दोघांनी मास्कची शिलाई करून देणाऱ्या प्रताप फडतरे याच्याशी संगनमत करून कंपनीत तयार झालेल्या लाखो रुपयांचा मास्कचा माल बाहेर काढला. त्यानंतर त्यांनी मास्क प्रताप फडतरे याला चढ्या दरात परस्पर विकले. दरम्यान, कंपनीत तयार होणारा माल व कंपनीतून बाहेर सप्लाय होणाऱ्या मालामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत येत असल्याचे निदर्शनास आल्याने कंपनीच्या संचालकांनी कंपनीतील सीसीटीव्हीची तपासणी करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, आकाश ढोबळे व प्रथमेश फडके या दोघांनीच हा अपहार केल्याचे आढळून आले.  

त्यामुळे कंपनीचे संचालक महेश कुडव यांनी आकाश ढोबळे व प्रथमेश फडके यांच्याकडे चौकशी केली असता त्या दोघांनी प्रताप फडतरे याच्याशी संगनमत करून 1 मार्च ते 13 एप्रिल या दीड महिन्यात 5 ते 6 वेळा कंपनीतील तयार मास्कचा माल परस्पर कंपनीतून काढून तो मूळ किमतीपेक्षा जास्त दराने सारिका इंटरप्रायजेसला दिला असल्याचे कबूल केले आहे. त्यानुसार कंपनीने आपल्या मालाची तपासणी केली असता, या दोघांनी 32 लाख 60 हजार रुपये किमतीच्या मास्कची परस्पर विक्री करून कंपनीची फसवणूक केल्याचे आढळून आले. त्यामुळे कंपनीने या दोघांसह सारिका एंटरप्रायजेसचा प्रमुख प्रताप फडतरे या तिघांविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.  

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

रकमेची देवाणघेवाण
मास्कच्या विक्रीतून आकाश ढोबळे याच्या बँक खात्यात 13 लाख 61 हजार रुपये, तर प्रथमेश फडके याच्या खात्यात 38 लाख रुपये सारिका इंटरप्रायजेसच्या बँक खात्यातून जमा झाल्याचे तसेच प्रताप फडतरे याने प्रथमेश फडके याला रोख 5 लाख रुपये दिल्याचे या दोघांच्या चौकशीत आढळून आले आहे. कंपनीकडून कायदेशीर कारवाई होऊ नये यासाठी प्रथमेश फडके त्याच्याकडे जमा झालेली 43 लाख रुपयांची रक्कम तर आकाश ढोबळे याने 13 लाख 23 हजार रुपयांची रक्कम व्हिनस कंपनीच्या खात्यात जमा केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 32 lakh mask scam in Taloja