esakal | मुंबईत 35 लाखांचे बनावट मद्य जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत 35 लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दहिसरमध्ये बनावट मद्यविक्रीवर छापा. कारवाईत एकूण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला 

मुंबईत 35 लाखांचे बनावट मद्य जप्त 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने दहिसरमधील दाऊद शेख चाळीत छापा टाकत बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे. कारवाईत एकूण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बनावट मद्यविक्रीच्या घटना सातत्याने पुढे येत असल्याने उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्‍ता लवंगारे शर्मा यांनी या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते.
 
मुंबईसह उपनगरांमध्ये सर्रास बनावट दारूची विक्री होते. यात हलक्‍या प्रतीचे मद्य विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटलीत भरून अवैध पद्धतीने विकले जाते. दरम्यान, या प्रकरणाबद्दल यापूर्वीदेखील उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर आता दहिसरमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली असून यात पंडित शंकरप्पा कलशेट्टी या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी शोधण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई सुरू आहे.
 
कलशेट्‌टी हा बनावट विदेशी मद्य तयार करण्याचे काम आपल्या राहत्या घरीच करीत होता. संबंधित माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळताच त्यांनी धडक कारवाई करत 500 बनावट दारूच्या बाटल्यांसह तब्बल 35 लाखांचा माल जप्त केला. कलशेट्टीच्या अटकेमुळे बनावट विदेशी दारू विकणाऱ्यांचे रॅकेट हाती लागण्याची शक्‍यता उत्पादन शुल्क विभागाने व्यक्त केली आहे.

कमी किमतीची दारू वापरून त्याला विदेशी मद्याच्या रिकाम्य बाटल्यांमध्ये भरून विदेशी मद्यांच्या नावावर अवैध विक्री केली जाते. अशा प्रकारच्या इतर कारवायादेखील सुरू आहेत; मात्र याच्या मुळाशी जाऊन सूत्रधार शोधण्याचे प्रयत्न आम्ही करीत आहोत. 
- प्राजक्ता लवंगारे वर्मा, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क 

 

loading image
go to top