'एफडीए'ची मोठी कारवाई! तब्बल 35 लाखांचा पान मलासा जप्त; अवैध वाहतूक करणार्‍यांवर दक्षता पथकाचा छापा

भाग्यश्री भुवड
Friday, 9 October 2020

विमल पान मसाला आणि व्ही-1 सुगंधित तंबाखू या राज्यामध्ये बंदी असलेले पदार्थ शुक्रवारी पहाटे नवी मुंबईतील ओयो सिल्व्हर की हॉटेलसमोर जप्त करण्यात आले

मुंबई : विमल पान मसाला आणि व्ही-1 सुगंधित तंबाखू या राज्यामध्ये बंदी असलेले पदार्थ शुक्रवारी पहाटे नवी मुंबईतील ओयो सिल्व्हर की हॉटेलसमोर जप्त करण्यात आले. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 35 लाखांचा माल जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) दक्षता विभाग, अंमली पदार्थ विराधी कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांनी एकत्रितरित्या ही कारवाई केली.

लॉकडाऊनमध्ये मानसिक समस्यांमध्ये वाढ, पालिकेला 30 सप्टेंबरपर्यंत 16 हजार कॉल्स

राज्यामध्ये बंदी असलेले विमल पान मसाला आणि व्ही- 1 सुगंधित तंबाखू परराज्यातून नवी मुंबईमध्ये आणण्यात येत असल्याची माहिती एफडीएला मिळाली. त्यानुसार एफडीएने नवी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षासोबत महापेमधील एमआयडीसी येथील ओयो सिल्व्हर की हॉटेलसमोर सापळा रचला. 9 ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास तीन गाड्या येऊन हॉटेल समोर उभ्या राहिल्या. एफडीए आणि पोलिसांनी या वाहनांमधील व्यक्तींना ताब्यात घेत तपासणी केली असता वाहनातून विमल पान मसाला व व्ही-1 सुगंधित तंबाखू या राज्यात प्रतिबंधित असलेल्या पदार्थांचा 35 लाख 53 हजार 312 किंमतीचा साठा जप्त केला. वाहनांसोबत असलेल्या जीतेंद्र दास, अखाया खंडा, प्रियव्रत दास, जनार्दन यादव या व्यक्तींना अटक करत सर्व वाहने जप्त केली. या प्रकरणी आरोपींविरोधात अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम व भारतीय दंडसंहिता अंतर्गत गुन्ह्यासाठी प्रथम खबरी अहवाल नोंदवण्यात आला.

मुंबई रेल्वे गाड्यांचे नियोजन करा; मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना

तक्रारीसाठी या क्रमांकावर करा संपर्क - 
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर, आयुक्त अरुण उन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांच्या नियंत्रणाखाली अन्न सुरक्षा अधिकारी, एम. आर. घोसलवाड, डी.एस. महाले, व्ही.एच. चव्हाण यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या गोदामाबाबत अथवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन एफडीएचे सह आयुक्त सुनील भारद्वाज यांनी केले.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 35 lakh paan malasa seized buy FDAs Vigilance team raids illegal transporters