पोलिसांवर हल्ल्याच्या 374 घटना, 900 जणांना अटक

अनिश पाटील
Sunday, 25 October 2020

पोलिसांवर हल्ला करणा-यांवर कडक कारवाईचे आदेश आहेत. त्याबाबत सूचनापत्रक असून त्या अंतर्गत आरोपींवर फक्त फौजदारी गुन्हाच नाही तर पोलिसांवर हल्ला करणा-या व्यक्तीची पोलिस ठाण्यात स्वतंत्र नोंद करण्यात येते.

मुंबई,ता.25 : मुंबईत वाहतुक पोलिसावर महिलेले केलेल्या हल्ल्याची घटना घडली आहे. कोरोनाच्या काळात नागरीकांच्या सुरक्षेसाठी तैनात अशा 374 पोलिसांवर हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. त्यात आतापर्यंत 900 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

काळबादेवी परिसरात कॉटन एक्सचेंज नाका येथे शनिवारी महिलेची दादागिरी पाहायला मिळाली. चक्क महिलेने कॉलर पकडून कानशिलात लगावली. याप्रकरणी एल टी मार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सादविका रमाकांत तिवारी (वय -30) राहणार मशीद बंदर आणि मोहसीन निजामउददीन खान (26) राहणार भेंडी बाजार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्यांना अटक करण्यात आली आहे. पण कोरोनाकाळात नागरीकांच्या सुरक्षेसांठी तैनात पोलिसांवर हल्ल्याची ही पहिली घटना नाही. राज्यभरात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या 374 घटना घडल्या असून त्यात 900 नागरीकांना अटक करण्यात आले आहे.  

महत्त्वाची बातमी : दानवे यांचा बाप दिल्लीत असेल, माझा बाप माझ्यासोबत, नाव न घेता उद्धव ठाकरेंनी कंगनालाही सुनावलं

लॉकडाऊनच्या काळात मालेगावमध्ये जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. मुंबईतील गोवंडी येथेही पोलिसांवर हल्ल्याच्या दोन घटना घडल्या होत्या.मरिन ड्राईव्ह येथे नाकाबंदी दरम्यान 27 वर्षीय तरुणाने तीन पोलिसांवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपी तरूणाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांवर हल्ला करणा-यांना जन्माची अद्दल घडते

पोलिसांवर हल्ला करणा-यांवर कडक कारवाईचे आदेश आहेत. त्याबाबत सूचनापत्रक असून त्या अंतर्गत आरोपींवर फक्त फौजदारी गुन्हाच नाही तर पोलिसांवर हल्ला करणा-या व्यक्तीची पोलिस ठाण्यात स्वतंत्र नोंद करण्यात येते. आरोपीला पारपत्र नुकनिकरण करताना तसेच नवीन पारपत्र बनवताना पोलिस हरकत घेतात. त्याबाबत सेवायोजन कार्यालयातही माहिती देण्यात येते. त्यामुळे नोकरीमध्ये समावून घेतानाही त्या व्यक्तीला भविष्यात त्रास होऊ शकतो.

तसेच या घटनेची माहिती विशेष शाखा-2 मार्फत विमानतळावर पोहोचण्यात येते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या परदेश वारीलाही अनेक अडचणी येतात. तसेच या घटनेची माहिती विशेष शाखा-1 ला देण्यात येते. त्यामुळे आरोपी व्यक्तीला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रही मिळवण्यात त्रास होऊ शकतो. तसेच संबंधीत व्यक्तीकडे परवानाधारक बंदूक असेल, तर त्याचा परवाना रद्द करण्यातही अडचणी येतात.

तसेच नोकरीच्या ठिकाणीही त्याच्या वरिष्ठांना संबंधीत घटनेची लेखी माहिती पुरवण्यात येते. त्यात संबंधीत व्यक्तीच्या गोपनीय अहवालात नोंद करण्याची व त्याला काळ्या यादीतही टाकण्यासाठी विनंती करावी, असे सूचना पत्रकात नमुद करण्यात आले आहे. 2012 मध्ये पोलिसांवर वाढते हल्ले लक्षात घेता, या कारवाया करण्याच्या सूचना पोलिसांना करण्यात आल्या होत्या. या मार्गदर्शक सूचनांचे पालन अद्यापही काही अंशी करण्यात येते. 

374 cases registered about assault on police 900 under arrest


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 374 cases registered about assault on police 900 under arrest