सफाईसाठी चक्क 4 किलोमीटर रस्ताच घेतला दत्तक

दिनेश गोगी
सोमवार, 24 डिसेंबर 2018

उल्हासनगर : स्वच्छ भारत सर्व्हेक्षणासाठी उल्हासनगर पालिकेने कंबर कसली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेने सफाईसाठी 4 किलोमीटर लांबीचा रोड दत्तक घेतला आहे.पालिकेद्वारे संघटनेला शाबासकी देण्यात आली असून काही सहकार्य हवे असल्यास ते देण्याची तयारी देखील दर्शवली आहे.
 

उल्हासनगर : स्वच्छ भारत सर्व्हेक्षणासाठी उल्हासनगर पालिकेने कंबर कसली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेने सफाईसाठी 4 किलोमीटर लांबीचा रोड दत्तक घेतला आहे.पालिकेद्वारे संघटनेला शाबासकी देण्यात आली असून काही सहकार्य हवे असल्यास ते देण्याची तयारी देखील दर्शवली आहे.

2016 पासून केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छ भारत सर्व्हेक्षण अभियान सुरू असून तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर, डॉ.सुधाकर शिंदे, गणेश पाटील व विद्यमान आयुक्त अच्युत हांगे, मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर, आरोग्य उपायुक्त विकास चव्हाण यांच्या देखरेखीखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार यांनी शहरात टापटीपणा ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. राजेंद्र निंबाळकर यांनी 2016 मध्ये आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी सकाळीच उठून शहराचा फेरफटका मारण्यास सुरवात केली होती. तेंव्हा तुडूंब भरलेल्या कुंड्यातील कचरा रोडवर पडत असल्याचे चित्र निंबाळकर यांच्या निदर्शनास आले होते. तेंव्हा सकाळी आठच्या नंतर कुंड्यात कचरा दिसल्यास कंत्राट रद्द करण्यात येणार अशी तंबी त्यांनी कंत्राटदार यांना दिल्यावर सकाळी सकाळीच कचऱ्याच्या कुंड्या रिकाम्या असे सुखावून सोडणारे दृश्य उल्हासनगरात दिसत होते. मात्र त्यानंतर मात्र थोडासा बदल झाला आणि काही ठिकाणी कचरा साचलेला दिसल्यावर आयुक्त अच्युत हांगे यांनी नाराजगी व्यक्त केल्यावर स्वच्छतेसाठी पालिकेचे आरोग्य विभाग सरसावलेले दिसत आहे.

त्यात 2018 चा शेवट आठवड्यावर येऊन ठेपल्याने उल्हासनगर पालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी पालिकेला सहकार्य म्हणून कॅम्प नंबर 5 मधील कैलास कॉलनी व्हाया चालिया मंदिर ते व्हीनस चौक तसेच नेताजी चौक व्हाया कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी असा 4 किलोमीटरचा रोड सफाईसाठी दत्तक देण्याची मागणी पालिका आयुक्त अच्युत हांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यास उपायुक्त आरोग्य विकास चव्हाण यांनी सहमती दर्शवली असून पालिकेचे सहकार्य हवे असल्यास ते देण्याची ग्वाही पालिकेच्या वतीने दिली आहे.
याबाबत मनसे कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप थोरात यांच्याशी विचारणा केली असता ख्रिसमस 25 तारखेला असल्याने सुट्टी आहे. 26 तारखेपासून आठवड्यातून दोन तीन दिवस रोड सफाईची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 kilometer road adopted taken for cleaning