चार वर्षांपासून शवागारात ४६ मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

पालिकेच्या रुग्णालयात कर्मचारी हैराण

अंधेरी : कांदिवली येथील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या शवागारात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल ४६ बेवारस मृतदेह चार वर्षांपासून पडून आहेत. त्यामुळे रुग्णालयाचे कर्मचारी आणि आसपासच्या रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दहिसर, मालवणी, कांदिवली आणि बोरिवली पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना कळवल्यानंतरही परिस्थिती कायम असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची अवस्था बिकट झाली आहे.

महाविकास आघाडीतील 'दोन' मंत्र्यांचा घेतला राजीनामा?

कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील शवागाराची मृतदेह ठेवण्याची क्षमता ३० ते ३५ असताना दहिसर, मालवणी, कांदिवली आणि बोरिवली पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून आलेले ४६ मृतदेह २०१५ पासून पडून आहेत. मृतदेहांच्या दुर्गंधीमुळे रुग्णालयातील कर्मचारी आणि आसपासचे रहिवासी हैराण झाले आहेत. शवागारात ४० पुरुष, चार महिला व दोन लहान मुलांचे मृतदेह आहेत. त्यापैकी काही मृतदेह रस्त्यावर बेवारस आढळले होते. काही मृतदेहांची ओळख पटली असूनही नातेवाईक पुढे आले नाहीत. त्यामुळे ते मृतदेह अंत्यसंस्कारांची वाट पाहात शवागारात पडून आहेत.

आरक्षणात रखडली म्हाडाची सोडत

चार वर्षांपासून शवागारात ठेवण्यात आलेल्या मृतदेहांची केवळ डीएनए चाचणी करण्यात आली आहे. त्या मृतदेहांचे विच्छेदन करण्यात आलेले नाही. विच्छेदन केल्यास मृतदेह काही काळातच खराब होऊ लागतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी रुग्णालयात आणलेल्या मृतदेहाची सर्व माहिती रजिस्टरमध्ये नोंदवली जाते. संबंधित पोलिस ठाण्याला सूचना देऊन मृतदेह शवागारात ठेवला जातो. त्यानंतर पोलिसांकडून मृतदेहाची मागणी झाल्यावर शवविच्छेदन करण्यात येते. पोलिसांनी मेमो दिल्यावर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येतो, असे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

"गुलशन कुमार यांची हत्या होणार हे ठाऊक होतं" राकेश मारियांचा खळबळजनक खुलासा...

शवागारातील मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आम्ही वृत्तपत्रांतून जाहिराती दिल्या आहेत; परंतु मृतांच्या नातेवाईकांनी अद्याप दावा केलेला नाही. या मृतदेहांची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
- मोहन दहीकर,
पोलिस उपायुक्त (झोन- ११)

शवागारातील मृतदेहांबाबत महापालिका आयुक्तांना अहवाल पाठवला असून, त्यांनी संबंधित अधिकारी आणि पोलिस ठाण्यांना कळवले आहे. या मृतदेहांचा इतरांना त्रास होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात येत आहे. शक्‍यतो मृतदेह केवळ सहा महिने शवागृहात ठेवून नंतर त्यांची विल्हेवाट लावण्यात येते. मृतांचे नातेवाईक आल्यानंतरच शवविच्छेदन करण्यात येते. 
- प्रमोद नगरकर,
अधिष्ठाता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली

46 bodies in the mortuary from four years


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 46 bodies in the mortuary from four years