file photo
file photo

'या' ठिकाणी बुलेट ट्रेनची कारशेड  बांधल्यास 48 हजार कोटींचा तोटा 

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी वांद्रे-कुर्ला संकुलात कारशेड बांधल्यास मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे तब्बल 48 हजार कोटींचे नुकसान होईल. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या कारशेडसाठी रेल्वेच्या दादर अथवा वांद्रे टर्मिनसजवळील जागा निवडण्याची शिफारस केंद्र सरकारला करावी, असे पत्र राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने मुख्यमंत्री कार्यालयाला दिले आहे.

मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तत्काळ मेट्रो रेल्वेच्या आरे वसाहतीतील कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. तर, बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित कारशेडला प्रशासकीय आक्षेप घेतला जात आहे. हा भाजपचा "ड्रीम प्रोजेक्‍ट' असल्याने येत्या काळात बीकेसीमधील कारशेडवरून वाद पेटण्याची शक्‍यता आहे.

नीती आयोगाने या वर्षीच्या जुलैमध्ये राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती मागवली होती. त्यात प्रकल्पाच्या गरजेनुसार प्राधान्यक्रमाने माहिती सादर करायची होती. तत्कालीन सरकारने बुलेट ट्रेनला वरचा क्रमांक देऊन प्रकल्पांची यादी नीती आयोगाकडे पाठवली होती. त्यापूर्वी गेल्या वर्षाच्या अखेरीस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बीकेसीमधील भूखंडाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. तेव्हाही नगरविकास विभागाने हा भूखंड दिल्यास एमएमआरडीएला 48 हजार कोटींचे नुकसान होईल, असे पत्र मंत्रिमंडळाला सादर केले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच राज्यातील महाकाय प्रकल्पांचा फेरआढावा घेण्यास सुरुवात केली 
आहे. त्या वेळी या कारशेडमुळे एमएमआरडीएचे 48 हजार कोटींचे नुकसान होईल, असा अहवाल नगरविकास विभागाकडून देण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 
बुलेट ट्रेनच्या कारशेडसाठी निवडलेल्या भूखंडावर एमएमआरडीएने आंतरराष्ट्रीय वित्त व व्यापार केंद्र बांधण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यानंतर बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारकडून बीकेसीतील याच भूखंडाची मागणी करण्यात आली. 

पर्यायी जागेच्या शिफारशीची विनंती 
बुलेट ट्रेनच्या भुयारी कारशेडसाठी वापरण्यात येणाऱ्या चटईक्षेत्र निर्देशांकामुळे पूर्वीच्या नियोजनानुसार वित्त केंद्र तेवढ्या क्षमतेचे बांधता येणार नाही. त्यामध्ये सुमारे 48 हजार कोटींचे नुकसान होऊ शकते, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला कळवल्याचे नगरविकास विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे पर्यायी जागा म्हणून वांद्रे किंवा दादर येथील रेल्वे टर्मिनसची जागा वापरण्याची शिफारस केंद्र सरकारला करावी, अशी विनंती नगरविकास विभागाने केली आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com