बारावीच्या पेपर फुटी प्रकरणी दोन महिलांसह 5 आरोपी अहमदनगरहून अटकेत... | HSC Exam 2023 Paper Leak | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

5 accused including two women arrested from Ahmednagar case of 12th paper leak

बारावीच्या पेपर फुटी प्रकरणी दोन महिलांसह 5 आरोपी अहमदनगरहून अटकेत...

मुंबई : बारावी गणिताची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी नगरमधून एका मुख्याध्यापकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी 10 हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याचे समोर आले आहे.

किरण संदीप दिघे, अर्चना बाळासाहेब भामरे, भाऊसाहेब लोभाजी अमृते, वैभव संजय तरटे, सचिन दत्तात्रय महारनवर अशी आरोपींची नावे आहेत. दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारीवरून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेच्या तपासात दादरमधील विद्यार्थ्यांला मिळालेली प्रश्नपत्रिका ही नगरमधील आरोपींकडून मिळाल्याचे समोर आलेत्यानंतर पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकासह दोन शिक्षक, एक चालक आणि शाळा मालकाच्या मुलीला अटक केली. यापूर्वी या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी 5 मार्चला अहमदनगर येथून एका संशयीताला ताब्यात घेतले होते.

परीक्षेपूर्वी पेपर हाती

तक्रारीनुसार, 3 मार्चला 12 वी विज्ञान शाखेची गणिताची परिक्षा होती. सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजून 10 मिनिटे परीक्षा चालल्यानंतर पर्यवेक्षक रॉबीन परेरा यांनी विद्यार्थ्यांच्या उत्तर प्रत्रिका स्वीकारल्या. त्यावेळी एका विद्यार्थ्यांकडे मोबाईल सापडला. त्यांनी हा प्रकार शाळेतील शिक्षिकेला सांगितला.

त्यावेळी व्हॉट्सॲप तपासणीत 10 वाजून 17 मिनिटांनी त्याला एका मित्राने गणिताची प्रश्नपत्रिका पाठवल्याचे निष्पन्न झाले. तसेच प्रश्नपत्रिकेची उत्तरेदेखील 10 वाजून 20 मिनिटांनी मागवण्यात आली होती. त्यानुसार याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला

टॅग्स :policecrime