Thane : प्लास्टिक बाळगल्यास ५ ते २५ हजारांचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Plastic-Ban

प्लास्टिक बाळगल्यास ५ ते २५ हजारांचा दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वसई : सार्वजनिक ठिकाणी कचरा केल्यास, तसेच प्लास्टिक, थर्माकोल बाळगल्यास कडक कारवाईचे धोरण वसई-विरार पालिकेने आखले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास ५ ते २५ हजारांपर्यंतच्या दंडनीय कारवाईचा बडगाही उगारला जाणार आहे. स्वच्छता अभियानाअंतर्गत हा निर्णय पालिकेने घेतला असला तरी, सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा पालिका ठेकेदारामार्फत उचलला जात नसल्याने याविरोधात कोणाला दंड आकारणार, असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारला जात आहे.

वसई-विरार पालिका हद्दीत दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो. कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या असतात. त्यामुळे ७५ मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या एकदाच वापर होणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या, भांडी व थर्माकोल यांसारख्या अविघटनशील वस्तू वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. या वस्तूंचा वापर आढळल्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास प्रथम वेळी ५ हजार दंड, तर नंतर १० व २५ हजार रुपये आकारण्यात येणार आहेत.

...असा आकारणार दंड

प्लास्टिक पिशव्या वापरण्यास मनाई करण्यात आली असून घनकचरा व्यवस्थापन विभागाने पत्रक काढले आहे. जर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना नागरिक आढळले तर १०० ते २००, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १०० व सावर्जनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जित केल्यावर २०० रुपये इतका दंड आकारला जाणार आहे.

वसई-विरार शहरात प्लास्टिक, थर्माकोलमुळे प्रदूषण होऊ नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी कचऱ्यामुळे घाण साचू नये यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, अन्यथा दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे.

- नीलेश जाधव, सहाय्यक आयुक्त, स्वच्छता विभाग.

पालिकेच्या कार्यालय परिसराची स्वच्छता होत नाही. दंडनीय कारवाईचा बडगा उगारण्याआगोदर पालिकेने स्वच्छतेसाठी प्रयत्न करावे. नालासोपारा पुलाखाली, तसेच विभाग कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात कचरा असतो. त्यामुळे सकाळी व सायंकाळी कचरा उचलणे गरजेचे आहे.

- अमित वैरागडे, नालासोपारा.

वसई-विरार शहरात अद्याप ओला व सुका कचरा वर्गीकरण होत नाही. दंड आकारणी ही चाप बसविण्यासाठी असली तरी प्लास्टिक शहरात येण्याची ठिकाणे तपासली तर प्लास्टिक हद्दपार होईल.

- गंगा यादव, वसई.

loading image
go to top