पाच वर्षीय चिमुकलीने केली कमाल

सकाळ वृत्‍तसेवा
Monday, 27 January 2020

प्रजासत्ताकदिनी हर्षिती भोईर हिचा विक्रम 

उरण : खेळण्या-बागडण्याच्या वयात हर्षिती कविराज भोईर या अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीने अनोखा असा विक्रम करून सर्वांना अचंबित केले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोणावळानजीक असलेले पाच किल्ले एका दिवसात सर करण्याचा निश्‍चय करून तिने कमाल केली आहे.

हे पण वाचा ः घर देता का घर...

७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लोणावळानजीक असलेले पाच डोंगर एका दिवसात सर करण्याचा विक्रम तिने निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत पूर्ण केला आहे. यामध्ये लोणावळानजीक असलेले श्रीवर्धन गड, मनरंजन गड, लोहगड, विसापूर, तिकोना हे पाच गड चढून पार केले आहेत. हर्षितीच्या या अनोख्या अशा ट्रेकची नोंदही वर्ल्ड बुक, आशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्याचा प्रयत्न असून हा ट्रेक यशस्वी झाल्यास हर्षिती ही सर्वात लहान ट्रेकर बनेल यात शंका नाही.

हे पण वाचा ः  ...या मार्गावरुन प्रवास करताना, जरा जपुन

हर्षिती कविराज भोईर ही चिमुकली गेल्या दोन वर्षांपासून आई आणि वडिलांसोबत किल्ले आणि डोंगर चढून पार करीत आहे. यामध्ये ती कसलीही तक्रार करीत नाही. तक्रार एकच- ती म्हणजे पायऱ्या असलेल्या किल्ल्यांवर चढायचा तिला कंटाळाच. किल्ले आणि डोंगरांच्या पायवाटेवरून किल्ले सर करायची तिला फारच आवड आहे. हर्षितीची हीच आवड तिच्या वडिलांनी ओळखली आणि आसपास असलेल्या किल्ल्यांवर ट्रेकिंग करायला सुरुवात केली. 

नवी मुंबईतील सिडकोच्या अग्निशमन दलात कार्यरत असलेले कविराज हे एक सर्पमित्र आहेत. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून ते उरण परिसरातील 'फ्रेंड्‌स ऑफ नेचर' या सर्पमित्र संघटनेचे सदस्य आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी कविराज आपली साडेतीन वर्षीय मुलगी हर्षिती हिला घेऊन किल्ले रायगडावर ट्रेकिंगला गेले होते. यावेळेस हर्षिती ही अगदी पटापट पायऱ्या चढत होती. हर्षितीची ही आवड हेरून कविराज आणि त्याच्या पत्नीने रायगड जिल्ह्यातील इतर किल्ले सर केले. यामध्ये हर्षितीने तिच्या आईडिलांसोबत कर्नाळा, आशेरी, राजमाची, श्रीवर्धन गड, कलावंतीण, तिकोना असे सुमारे १३ गड सर केले आहेत. यामध्ये तुंग हा कठीण मानला जाणारा गडदेखील हर्षितीने सर केला असून मागील वर्षीच्या जून महिन्यात ट्रेकर्सची दमछाक करणारा सुमारे १६६४ मिटर उंचीचा कळसूबाईचा शिखरदेखील अवघ्या साडेतीन तासांत यशस्वीपणे सर केला. यावेळी हर्षिती शेवटच्या टप्प्यात असलेल्या ७० ते ८० अंशातील शिडीवरदेखील निर्धास्तपणे चढली. 

आतापर्यंत सर केलेले किल्ले 
रायगड, कर्नाळा, श्रीवर्धन गड, प्रबळगड, कलावंतीण दुर्ग, शिवनेरी, लोहगड, विसापूर, तिकोना गड, तुंग (कठीण गड), मोरगिरी किल्ला, कोरी गड, आशेरी गड असे एकूण १३ किल्ले सर केले आहेत. त्यामुळे "आशिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये हर्षितीने आपले नाव कोरले आहे. 

कलावंतीणचा डोंगर अवघ्या दोन तासांत पार 
गेल्या वर्षभरात हर्षिती हिने दक्षिण घाटातील प्रसिद्ध असलेला पनवेल तालुक्‍यातील कलावंतीणचा सुमारे २२५० फूट उंचीचा डोंगरदेखील अवघ्या दोन तासांत पार केला आहे. या वेळी मात्र डोंगराच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या 1१५ फुटांच्या उंचीवर दोराने चढताना हर्षितीला उचलून चढवावे लागल्याचे कविराजने सांगितले. हर्षिती हिच्या मेहनतीचं फळ म्हणजे अवघ्या साडेतीन वर्षांची असताना कसळूबाईच्या शिखरावर चढाई करून आपल्या नावाची नोंद "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' आणि "आशिया बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये करण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 years old girl done to finish five forts in one day.