esakal | महावितरण कंपनीची आर्थिक घडी विस्कटली, ग्राहकांनी थकवले 693 कोटी

बोलून बातमी शोधा

MSEDCL bill
महावितरण कंपनीची आर्थिक घडी विस्कटली, ग्राहकांनी थकवले 693 कोटी
sakal_logo
By
तेजस वाघमारे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी लागू केलेल्या लॉकडाऊननंतर महावितरणच्या अनेक वीज ग्राहकांनी वीज बिल भरलेले नाही. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतल्यानंतरही भांडूप परिमंडळातील मुंबई, ठाणे, रायगड मधील ग्राहकांनी तब्बल 693.19 कोटी रुपये थकवले आहेत.

वीज ग्राहकांनी वीज देयके भरली नसल्याने महावितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीने फेब्रुवारी आणि मार्च 2021 मध्ये थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेक ग्राहकांनी आपले थकीत वीजदेयक भरले. मात्र आज ही कित्येक ग्राहकांनी आपली देयके भरलेली नाहीत. महावितरण भांडूप परिमंडळमध्ये उच्चदाब आणि लघुदाब घरगुती ग्राहकांकडे 180.29 कोटी रुपये थकीत आहे. तर व्यवसायिक ग्राहकांची 140.94 कोटी, औद्योगिक ग्राहकांचे 150.85 तर इतर वर्गवारीतील ग्राहकांचे 18.3 कोटी, पाणीपुरवठा योजनांचे 7.66 कोटी थकबाकी आहे. याशिवाय स्ट्रीट लाईटचे 191.57 कोटी तर कृषी ग्राहकांचे 4.39 कोटी असे एकूण 693.99 कोटी थकबाकी आहे.

हेही वाचा: झोपडपट्टी आणि इमारतीत कशी आहे रोगप्रतिकार शक्ती, जाणून घ्या

महावितरण कंपनीला महिना अखेरीस विविध वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांना वीज खरेदीसाठी लागणारी रक्कम भरावी लागते. सध्या उन्हाचा पारा वाढला असून जवळ-जवळ 29 हजार मेगावॅटपर्यंत विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. जर ग्राहकांनी वेळेत वीजबिले न भरल्यास वीजखरेदीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांना अविरत वीजपुरवठा उपलब्ध करण्यासाठी महावितरणचे वीजबिल भरावे असे आवाहन महावितरणच्या भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.

----------------------

(संपादन- पूजा विचारे)

693 crore electricity bills exhausted electricity consumers bhandup circle customers