esakal | Covid 19: झोपडपट्टी आणि इमारतीत कशी आहे रोगप्रतिकार शक्ती, जाणून घ्या

बोलून बातमी शोधा

containment zone
झोपडपट्टी आणि इमारतीत कशी आहे रोगप्रतिकार शक्ती, जाणून घ्या
sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोविड विरोधात रोगप्रतिकारक शक्तीची तपासणी करणारा तिसऱ्या सेरो सर्वेक्षणाचा अहवाल महानगर पालिकेनं जाहीर केला आहे. यात झोपडपट्टी भागातील नागरिकांमधील कोविड विरोधातील रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे. तर बिगर झोपडपट्टी भागातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. संपूर्ण मुंबईतील 36.30 टक्के नागरिकांमध्ये कोविड विरोधातील रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली आहे.

मुंबईतील 10 हजार 197 नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. यात रक्तांमध्ये कोविड विषाणू विरोधात प्रतिपिंडे तयार झाली आहेत का हे पाहण्यात आले. रक्तात प्रतिपिंडे तयार होणे आजाराविरोधात रोगप्रतिकारक शक्ती तयार होणे, अशी रोगप्रतिकार शक्ती मुंबईतील 36.30 टक्के नागरिकांमध्ये आढळली आहेत. आतापर्यंत तीन वेळा हे सर्वेक्षण झाले असून मार्च 2021 मध्ये पहिल्यांदाच संपूर्ण मुंबईत हे सर्वेक्षण करण्यात आले, अशी माहिती महानगर पालिकेकडून देण्यात आली. या सर्वेक्षणात लसीकरण न झालेल्या नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे.ऑगस्ट 2020 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात 27 टक्के नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आढळली होती. मात्र हे सर्वेक्षण काही प्रभागातच झाले होते.

हेही वाचा: '...तरच रेमडिसीवर इंजेक्शन वापरा'

जुलै 2020 मध्ये काही प्रभागात झालेल्या सर्वेक्षणात झोपडपट्टीतील 57 टक्के नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आढळली होती. त्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात हे प्रमाण 45 टक्‍क्‍यांवर आले.तर,आता हे प्रमाण 41.6 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आहे. दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी वगळता इतर भागातील नागरिकांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. जुलै महिन्याच्या सर्वेक्षणात 16 टक्के,ऑगस्ट मध्ये 18 टक्के आणि मार्च 2021 च्या सर्वेक्षणात हे प्रमाण 28.5 टक्‍क्‍यां पर्यंत वाढले आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत इमारती टॉवरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक बाधा होत आहे. त्यामुळे तिसऱ्या सर्वेक्षणात याच भागातील नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढली असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मुंबईतील फक्त तीन प्रभागात हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

महिला अधिक सक्षम

पुरुषांच्या तुलनेनं अधिक महिलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आढळून आली आहे. 35.02 टक्के पुरुषांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली आहे. 37.12 टक्के महिलांमध्ये सकारात्मकता आढळली आहे.

लसीकरण वेगात हवे

या सर्वेक्षणाच्या आधारे तज्ज्ञांनी लसीकरणाची मोहिम अधिक गतिमान करण्याची शिफारस केली आहे. त्याच बरोबर नागरिकांनी मास्क वापरणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आणि सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे.

गरजेपेक्षा निम्मे प्रमाण

70 टक्के नागरिकांमध्ये एखाद्या आजाराविरोधात रोगप्रतिकारक शक्ती तयार झाल्यास उर्वरीत 30 टक्के नागरिकांचे नैसर्गिकरित्या या आजारापासून संरक्षण होते, असे वैद्यकिय शास्त्रात मानले जाते. मात्र मुंबईत 36 टक्के नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आढळली असून हे प्रमाण गरजेपेक्षा जवळ जवळ निम्मे आहे.

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

covid 19 in slums immunity decreased grew up in building