आर्थिक राजधानीतील आर्थिक गुन्ह्यांत 70 टक्क्यांनी घट, लॉकडाऊनमध्ये केवळ चारच गुन्हे दाखल

अनिश पाटील
Friday, 16 October 2020

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लॉकडाऊनमुळे बहुतांश आर्थिक व्यवहार आणि कार्यालये बंद असल्यामुळे मोठ्या आर्थिक गुन्ह्यांतही 70 टक्क्यांनी घट झाली आहे. कोरोनामुळे कडक लॉकडाऊन असलेल्या पाच महिन्यांमध्ये केवळ चारच गुन्ह्यांनी नोंद झाली आहे.

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लॉकडाऊनमुळे बहुतांश आर्थिक व्यवहार आणि कार्यालये बंद असल्यामुळे मोठ्या आर्थिक गुन्ह्यांतही 70 टक्क्यांनी घट झाली आहे. कोरोनामुळे कडक लॉकडाऊन असलेल्या पाच महिन्यांमध्ये केवळ चारच गुन्ह्यांनी नोंद झाली आहे. सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे गेल्या वर्षी आर्थिक गुन्ह्यात सहभागी मालमत्ता ही 28 हजार कोटी रुपये होती. त्याच्या तुलनेत यावर्षी ही रक्कम केवळ 707 कोटी रुपये आहे. गेल्यावर्षीचा महाराष्ट्र राज्य सरकारी बँक प्रकरण आणि यावर्षीचे लॉकडाऊन या तफावची प्रमुख कारणे असल्याचे वरिष्ठ अधिका-याचे म्हणणे आहे.

देशातील आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक महत्त्वाची कॉर्पोरेट कार्यालये आणि मुख्यालय आहेत. त्यामुळे येथे दाखल होणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण आणि त्यात सहभागी मालमत्तांचा आकडाही मोठा असतो. अशा बड्या आर्थिक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष आर्थिक गुन्हे शाखा आहे. यावर्षी या आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये 70 टक्क्यांनी घट झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार, यावर्षी 24 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सर्व गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून या आर्थिक गुन्ह्यांत सहभागी मालमत्ता 707 कोटी सहा लाख रुपये आहे. 

2019 मध्ये याच कालावधीत आर्थिक गुन्हे शाखेकडे 80 गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यात सहभागी मालमत्तेचा आकडा 28 हजार 48 कोटी रुपये एवढा प्रचंड होता. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आर्थिक गुन्ह्यांत सहभागी मालमत्ता सुमारे 27 हजार कोटींनी कमी आहे.

अधिक वाचाः  सध्याच्या जीवनशैलीमुळे किडणी, मूत्रविकार सहा पटीने वाढले

कोरोना संकटांमुळे यावर्षी मुंबईसह देशभरात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला होता. या काळात एप्रिल महिन्यात एकही गुन्हा दाखल झाला नव्हता. मे महिन्यात एक, जून महिन्यात तीन आणि जुलै महिन्यात एक असे लॉकडाऊनमध्ये केवळ चार गुन्हेच दाखल झाले होते. गेल्यावर्षी याच चार महिन्यांमध्ये 39 बड्या आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली होती. याशिवाय गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यात सहभागी मालमत्तेचा आकडा 25 हजार कोटी रुपये होता. त्याप्रकरणी  आर्थिक गुन्हे शाखेने नुकताच क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. हा गुन्हा जरी वगळला. 

गेल्यावर्षी अपहार झालेली रक्कम सुमारे अडीच हजार कोटींनी अधिक आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे अनेक तक्रार अर्ज येतात, त्यांची पडताळणी केल्यानंतर उरलेल्या प्रकरणांमध्ये प्राथमिक चौकशी केली जाते. त्याबाबत वरिष्ठ अधिका-यांसोबत सल्ला मसलत केल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येतो. लॉकडाऊनच्या काळात मुंबई पोलिसांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढला होता. आर्थिक गुन्हे शाखेतीलही काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याची बाधा झाली होती. तसेच मुंबईतील अनेक कॉर्पोरेट कार्यालयेही बंद असल्यामुळे गुन्ह्यांत कमी झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

-----------------------

(संपादनः पूजा विचारे)

A 70 per cent drop in financial crimes mumbai only four cases filed in lockdown


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A 70 per cent drop in financial crimes mumbai only four cases filed in lockdown