सलाम 'त्या' कोरोना योद्ध्यांना! चार महिने अखंड सेवा करणारे 70 आरोग्य कर्मचारी एकदम ठणठणीत

दिनेश गोगी
Saturday, 15 August 2020

कुणालाही बाधा झाली नसून त्यांनी केलेल्या व करत असलेल्या सेवेची पोचपावती म्हणून सर्वांना कोविड योद्धा गौरव सन्मानपत्र देण्यात आले अशी माहिती डॉ.दिनेश चव्हाण,डॉ. भावना तेलंग यांनी दिली.

उल्हासनगर : केवळ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करताना गेल्या 4 महिन्यापासून अखंड सेवा देताना कुणालाही कोरोनाची बाधा झाली नाही. ही किमया उल्हासनगरातील डेडिकेटेड कोविड-19 हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 70 जणांच्या विलपॉवरने करून दाखवली आहे. आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या सर्वांना वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश चव्हाण, वैद्यकीय अधिक्षिका डॉ.भावना तेलंग यांच्या पुढाकाराने कोरोना योद्धा गौरव सन्मान प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

मोठी बातमी : स्वातंत्र्यदिनी डोंबिवलीकर अंधारात! गोग्रासवाडी, नामदेवपथ परिसरातील वीजपुरवठा पंधरा तास खंडीत

उल्हासनगरात कोरोना प्रादुर्भावने दस्तक देण्यास सुरुवात करताच तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी उल्हासनगरात कॅम्प नंबर 4 मेन रोडवर असलेल्या शासकीय प्रसूतिगृहाचे कोविड 19 हॉस्पिटलमध्ये रूपांतर केले होते. त्यास 4 महिने झाले असून वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश चव्हाण, अधिक्षिका डॉ. भावना तेलंग यांच्या देखरेखीखाली याठिकाणी येणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णाने कोरोनावर मात केल्यावर त्याच्यावर फुलांचा वर्षाव करून निरोप देण्याचा पायंडाही डॉ. चव्हाण, डॉ. तेलंग यांनी सुरू केला आहे.

नक्की वाचा : राज्य सरकारने वीजबिलाबाबत 'दिल्ली पॅटर्न' राबवावा; कोणी केली ही मागणी वाचा

विशेष म्हणजे कॅम्प नंबर 3 मध्ये असलेल्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स तसेच महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. दोघांचा मृत्यूही झाला आहे. मात्र गेले 4 महिने तेही फक्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची अविरत सेवा करणारे कोव्हिड रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, क्ष-कीरण तज्ञ, डॉक्टर्स, नर्स, तीन पाळ्यात काम करणारे सफाई कामगार अशा 70 जण कोरोनापासून सुरक्षित राहिले. कुणालाही बाधा झाली नसून त्यांनी केलेल्या व करत असलेल्या सेवेची पोचपावती म्हणून सर्वांना कोविड योद्धा गौरव सन्मानपत्र देण्यात आले अशी माहिती डॉ.दिनेश चव्हाण,डॉ. भावना तेलंग यांनी दिली.

(संपादन : वैभव गाटे)

70 corona health workers who have been healthy from last four months


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 corona health workers who have been healthy from last four months