esakal | 75 बालकामगार मुंबईत अडकले; तीन महिन्यानंतरही प्रशासन सुस्त 
sakal

बोलून बातमी शोधा

75 बालकामगार मुंबईत अडकले

मुंबईतील विविध भागांतून सुटका करण्यात आलेले 75 बाल मजूर लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईतील डोंगरी येथील बालसुधारगृहात अडकून पडले आहेत.

75 बालकामगार मुंबईत अडकले; तीन महिन्यानंतरही प्रशासन सुस्त 

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : मुंबईतील विविध भागांतून सुटका करण्यात आलेले 75 बाल मजूर लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईतील डोंगरी येथील बालसुधारगृहात अडकून पडले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडसह 9 विविध राज्यांतील ही मुले त्यांच्या घरी जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ई-पास, लॉकडाऊनमध्ये वाढलेला प्रवास खर्च यांमुळे तीन महिन्यांत केवळ एकच कुटुंब आपल्या मुलाला नेण्यासाठी सुधारगृहापर्यंत पोहोचू शकले. उर्वरीत मुलांसाठी प्रयत्न करूनही परराज्यातील यंत्रणांकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातील 15 वर्षांचा मुलगा. कुटुंबाची हलाकीची परिस्थिती असल्यामुळे वडिलांना आधार म्हणून गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कामाच्या शोधात आपल्या मोठ्या भावासोबत मुंबईत आला होता. पुढे सहा हजार रुपये प्रतिमहिना पगारावर तो मालाड येथील बांगड्या बनावण्याचे काम करू लागला. कामाच्या ठिकाणी त्याला 14 तास राबवून घेतले जायचे, पण या मुलाकडे कोणता पर्याय नव्हता. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी त्याच्या कामाच्या ठिकाणी छापा टाकून मुलाची सुटका केली. त्याच्या सुरक्षेसाठी त्याला डोंगरीतील बाल सुधारगृहात ठेवण्यात आले. तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला विश्वासात घेऊन या मुलाचा कुटुंबीयांची माहिती घेतली व त्यांना संपर्क साधला. तुमचा मुलगा सुखरूप असून लवकरच त्याला तुमच्या गावी आणले जाईल, असे डोंगरी बाल सुधारगृहाकडून या मुलांच्या कुटंबियांना सांगण्यात आले. कुटुंबियही मुलगा येण्याची वाट पाहू लागले. सर्व ठीक होतेय, असे वाटत असतानाच कोरोना संकट रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. तेव्हापासून हा मुलगा डोंगरी सुधारगृहात अडकून पडला असून कुटुंबीयांना लवकरच भेटता येईल, या आशेवर दिवस घालवत आहे.

बालमजुरांना कुटुंबाची आस
या मुलाप्रमाणेच सुटका करण्यात आलेले 74 बाल मजूर कुटुंबाला भेटण्याच्या प्रतिक्षेत आहेत. स्वयंसेवी संस्था, पोलिस यांनी या मुलांची सुटका केली होती. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, तामिळनाडू, केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल व दिल्ली अशा विविध राज्यांतील ही मुले असून त्यात हरवलेली, घरून पळून आलेल्या मुलांचाही समावेश आहे.

तणाव कमी करण्यासाठी समुपदेशन
बाल सुधारगृहात सर्वाधिक म्हणजे 16 मुले उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील आहे. तेथील संबंधित विभागांशी संपर्क साधण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसात मिळाना नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. कोरोनामुळे सुधारगृहातील मुलांमध्ये सध्या काही प्रमाणात तणाव आहे, त्यामुळे मुलाचे अधून मधून कुटुंबीयांसोबत फोनवरून बोलणे करून दिले जात आहे. त्यामुळे तणावाच्या काळात मुलांसाठी काही क्षण आनंदाचे मिळत आहेत. तणाव कमी करण्यासाठी त्यांचे नियमीत समुपदेशनही केले जात आहे.

हेही वाचा,

'या' तारखांची नोंद करून ठेवा, या तारखांना यावेळी येणार समुद्रात हायटाईड