भिवंडीतून अपहरण झालेल्या आठ वर्षीय मुलाची नाशिकच्या जंगलातून सुटका  

crime_logo
crime_logo

वज्रेश्वरी - मुलाला त्याच्या काकाच्या घरी सोडतो असे सांगून अपहरणकर्त्याने मुलाला नाशिकजवळील, घोटीच्या जंगलात पळवून नेल्याची घटना उघडकीस आली होती. या अपहृत मुलाची ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने सुटका करून मुलाला आईवडिलांच्या ताब्यात दिले आहे. सुमित सुरेश ईरणक (८ वर्ष रा.कासणे ) असे सुटका झालेल्या मुलाचे नांव आहे. 

सदर मुलाला अपहरणकर्ता यशवंत देवू धोबी (४० रा.डोळखांब,ता.शहापूर) याने २७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुलाला त्याच्या काकाच्या घरी सोडतो असे सांगून त्याला काकाच्या घरी न सोडता घोटी जवळील पैनीच्या जंगलात पळवून नेले होते. या अपहरण प्रकरणी मुलाचे वडिल सुरेश भाऊ ईरणक (३३) याने पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानूसार पडघा पोलिसांकडून तपास सुरु होता. मात्र मुलाच्या अपहरण घटनेला एक महिना उलटला तरी मुलगा सापडत नाही. त्यामुळे मुलाचे अपहरण कर्त्याने काही बरेवाईट केले असावे अशी भीती निर्माण झाली होती. मुलाच्या अपहरणाचा तपास एक आव्हान म्हणून उभे राहिल्याने ठाणे जिल्हा (ग्रा.) पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी आढावा घेवून तपासाची चक्रे जदगतीने फिरवण्याचे निर्देश दिले. 

त्यामुळे अप्पर पोलिस अधिक्षक संजय कुमार पाटील, एलसीबी शाखेचे वपोनि. व्यंकट आंधळे यांनी एपीआय संदीप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. हर्ष रजपूत, पोह.कमलाकर काशिवले, रविंद्र चौधरी, धनाजी कडव, गोरक्षनाथ मुंढे, सुनिल कदम, अमोल कदम, हनुमान गायकर, उमेश ठाकरे, अजय सकपाळ, सतीश कोळी, दिपक गायकवाड, रवि राय आदींचे पथक तयार करून कसून तपास केला असता यशवंत धोबी हा मुलाला घेवून घोटीलगतच्या पैनीच्या जंगलात राहत असल्याची माहिती मिळाल्याने या जंगलात सापळा लावून अपहरणकर्ता यशवंत धोबी यास ताब्यात घेवून सुमित याची त्याच्या तावडीतून सुटका केली. 

मुलाच्या अपहरणाबाबत पोलिसांनी धोबी याच्याकडे चौकशी केली असता मला लहान मुलाची आवड असल्याने मी हे कृत्य केले अशी कबुली अपहरण कर्त्याने दिल्याने पोलिसही अवाक झाले. या अपहरणाच्या गुन्ह्याचा पुढील तपास पडघा पोलीस करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com