शासकीय अधिकारी त्रास देतात म्हणून 90 डॉक्टरांचे राजीनामे, शासकिय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आरोप

मिलिंद तांबे
Wednesday, 30 September 2020

कोरोना काळात प्रामाणिकपणे काम करणा-या डॉक्टरांना शासकीय अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करत राज्यातील 90 डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत.

मुंबई, ता. 30 : कोरोना काळात प्रामाणिकपणे काम करणा-या डॉक्टरांना शासकीय अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करत राज्यातील 90 डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत. राज्यभरातील काही जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय अधिका-यांना अरेरावी तसेच अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने डॉक्टरांचे खच्चीकरणा होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) आरोग्य विभागाला पत्र लिहून अशा अधिका-यांवर कारवाईची मागणी केली आहे.

राज्यातील राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचं नेतृत्व करणाऱ्या मॅग्मो संघटनेने आरोग्यमंत्री तसेच आरोग्य विभागाला लिहिलेल्या पत्रात या प्रकरणाला वाचा फोडली आहे. राज्यातील वैद्यकीय अधिकारी कोरोना विरोधात प्रमाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रंत, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडून डॉक्टरांना अरेरावी तसेच  अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे डॉक्टरांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.

महत्त्वाची बातमी : किशोरी पेडणेकर आणि अनिल परब यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार अर्ज दाखल

शासकीय अधिका-यांच्या त्रासाला कंटाळून राज्यभरातील 90 डॉक्टरांनी राजीनामे देऊन कामबंद आंदोलन सुरू केले आहे. डॉक्टरांना होणाऱ्या त्रासाबद्दल वरिष्ठ अधिका-यांना वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न होतो. मात्र वरिष्ठ अधिकारी याची गांभिर्याने दखल घेत नसल्याने डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत प्रशसासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी मॅग्मो संघटनेने केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच त्यासाठी जिल्हाधिकारी जबाबदार असतील असा इशारा मॅग्मो संघटनेचे अध्यक्ष डॉ राजेश गायकवाड यांनी दिला आहे.

याविषयावर आरोग्यमंत्री राजेश टोपे,आरोग्य संचालिका डॉ साधना तायडे यांच्या सोबत बैठक झाल्याची माहिती ही डॉ गायकवाड यांनी दिली. याबाबत लवकरच राज्यभरातील वैद्यकीय अधिका-यांशी बोलून जिल्हाधिका-यांसोबत चर्चा कऱण्यात येणार आहे. त्यातून काहीतरी तोडगा निघेल अशा विश्वास डॉ. गायकवाड यांनी व्यक्त केला असून जिल्हाधिका-यांनी योग्य प्रतिसाद न दिल्यास त्यातून उद्भवणा-या परिस्थितीला जिल्हाधिकारी जबाबदार असतील असा इशारा ही गायकवाड यांनी दिला आहे.

90 doctors resign as government officials harass allegations of government medical officers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 90 doctors resign as government officials harass allegations of government medical officers