क्या बात! मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट रूग्णालयात 90 पार केलेल्या रूग्णांची कोरोनावर यशस्वी मात

भाग्यश्री भुवड
Thursday, 17 September 2020

मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या घनश्यामदास चंचलानी 92 आणि माधुरी संपत (91) यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

मुंबईः  वयोमानानुसार रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने कोरोनाचा सर्वाधिक धोका हा वयोवृद्धांना आहे. या विषाणूची लागण होऊन मृत्यू होणाऱ्यांमध्ये वृद्धांचा आकडा अधिक आहे. मात्र आता कोरोना या व्हायरसशी झुंज देत यातून सुखरूप बाहेर पडणाऱ्या वयोवृद्धांची संख्याही वाढू लागली आहे. जिद्दी आणि इच्छाशक्तीमुळे हे वृद्ध कोरोनामुक्त होऊन पुन्हा सर्वसामान्य जीवन जगतात, याचा प्रत्यय नुकताच आला आहे. 

मुंबईत कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये सर्वच स्तरातील रूग्ण आढळून येत आहे. अशा स्थितीत वयोवृध्दांना या आजाराचा धोका अधिक असल्याचे दिसून आले आहे आणि म्हणूनच वयाची साठी उलटलेल्या वयोवृध्दांना धोका अधिक असल्याचे दिसून येत असतानाच मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या घनश्यामदास चंचलानी 92 आणि माधुरी संपत (91) यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

पनवेलमध्ये राहणारे घनश्यामदास चंचलानी (92) यांना अचानक ताप येऊ लागला होता. स्थानिक डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू होते. पण, प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. म्हणून कोविडची शक्यता पडताळून पाहण्यासाठी त्यांची स्वॅब टेस्ट आणि रक्तचाचणी  करण्यात आली. या वैद्यकीय चाचणीत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं.

याशिवाय, 91 वर्षीय माधुरी संपत यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. या महिलेच्या हाडांना फ्रॅक्चर झाल्याने त्या गेल्या सहा महिन्यांपासून अंथरूणात होत्या. मात्र अचानक ताप आणि अंगदुखी होऊ लागल्याने त्यांना वोक्हार्ट रूग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी लघवीत इंफेक्शन असल्याचेही समोर आलं आहे. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

या रूग्णालयातील कन्सल्टेंट फिजिशियन आणि डायरेक्टर इंटरनल मेडिसिन डॉ. बेहराम पारडीवाला यांच्या देखरेखीखाली या दोन्ही रूग्णांवर उपचार सुरू होते.

कोरोना पॉझिटिव्ह असल्याने रूग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. रूग्णालयात आणलं तेव्हा त्यांना खूप ताप होता. कुटुंबियांची सुद्धा कोविड- 19 चाचणी करण्यात आली होती. यात चंचलानी यांचा मुलगा पॉझिटिव्ह आढळून आल्यानं त्यालाही रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर दोघांवर औषधोपचार सुरू करण्यात आले. आम्ही दिवसातून तीन वेळा त्यांची ऑक्सिजन पातळी तपासत होतो. 12 दिवसांनंतर त्याची सामान्य ऑक्सिजन पातळी 98 इतकी होती. दोघांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आल्यानं त्याला घरी सोडण्यात आलं. त्यानंतर घरी त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते.

डॉ. बेहराम पारडीवाला, वोक्हार्ट रूग्णालय, मुंबई सेंट्रल

---------------------

(संपादनः पूजा विचारे)

90 years Patients Wockhardt Hospital Mumbai Central successfully beat corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 90 years Patients Wockhardt Hospital Mumbai Central successfully beat corona