
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पवई पोलिस चौकी येथे अटक करण्यात आली आहे.
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पवई पोलिस चौकी येथे अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी गोयल आणि इतर पोलिस अधिकारी सोबत आहेत. आरे प्रकरणात विरोध करण्यासाठी पोहोचलेल्या प्रकाश आंबेडकरांना अटक केल्याने वंचित आघाडीचे कार्यकर्ते संतापले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.
आरे परिसरात मेट्रो कारशेडच्या नावने वृक्षतोड करुन जागा हडपण्याचा डाव आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. भाजपा, शिवसेना सरकारला इथली जागा हडप करायची आहे. एवढंच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही स्वार्थ यामध्ये आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
मुंबईकर या सरकारला आरे वृक्षतोडीवरुन योग्य उत्तर देतील असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. आरे वृक्षतोडीच्या वादात आता वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतली आहे. पवई फिल्टरपाडा या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी दुपारी आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना 'आरे'तील वृक्षतोडीला विरोध केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली. या अटकेच्या विरोधात अकोल्यातील अशोक वाटिका चौकामध्ये वंचित बहुजन आघाडी तथा भारिप-बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करीत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. आरे'तील वृक्षतोडीला विरोध करण्याकरता गेलेले बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंबेडकर यांच्या अटकेच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.