
आरे रस्ता तात्पुरता बंद! मेट्रोच्या कामासाठी पुन्हा झाडतोड होत असल्याची तक्रार
मुंबई : मेट्रो कारशेडमुळं सध्या गाजत असलेल्या आरे वसाहतीतून जाणारा रस्ता हा पुढील चोवीस तासांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. एमएमआरसी आणि एमसीजीएमकडून या ठिकाणी काही काम सुरु असल्यानं हा रस्ता तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात येत असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. पण या भागात पुन्हा झाडतोड सुरु असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. (Aarey road temporarily closed Complaint that trees are being cut down again for metro work)
मुंबई पोलिसांनी आपल्या निवदेनात सांगितलं की, आरे रस्ता चोवीस तासांसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, आज मध्यरात्रीपासून उद्या मध्य रात्रीपर्यंत हा रस्ता बंद राहणार आहे. या ठिकाणी एमएमआरसी आणि एमसीजीएमकडून काही कामं सुरु असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं पवई आणि मरोळला जाण्या-येण्यासाठी JVLR चा वापर करा, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा: निवडणूक आयोगाच्या 'त्या' निर्देशांविरोधात शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव!
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारनं आरे कारशेड कामावरील बंदी उठवल्यानंतर सोमवारपासून पुन्हा कारशेडच्या कामाला सुरुवात झाली आहे. पण आज हा रस्ता बंद राहण्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात झाडं कापली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. पण आरेमधील बंदी उठवताना यापूर्वीच इथली झाडं कापून झाली असून यापुढील कामासाठी झाडं तोडावी लागणार नाहीत, असं फडणवीसांनी मीडियासमोर वारंवार स्पष्ट केलं होतं. पण तरीही झाडतोड होत असल्यानं पुन्हा एकदा हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Policy Bazaar : पॉलिसी बाझारची IT सिस्टीम हॅक; ग्राहकांच्या डेटाबाबत दिलं स्पष्टीकरण
आरे वसाहत ज्या भागात मेट्रोचं कारशेड होणार आहे. तो भाग दाट झाडी असलेला जंगलाचा भाग आहे. फडणवीस सरकारच्या काळात इथं रात्रीतून झाडांची कत्तली करण्यात आल्या होत्या. पण नंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारचा हा निर्णय रद्द करत कारशेड कांजुरमार्गला हालवलं होतं. पण एकनाथ शिंदेंसोबत फडणवीस पुन्हा सत्तेत आल्यानंतर नव्या सरकारनं कांजूरमार्गच्या कामाला स्थगिती देत पुन्हा आरेमध्ये कारशेडच्या कामाला परवानगी दिली आहे. त्यामुळं आरेमध्ये पुन्हा एकदा कारशेडच्या कामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, याला पर्यावरणवाद्यांचा सातत्यानं विरोध सुरुच आहे.
Web Title: Aarey Road Temporarily Closed Complaint That Trees Are Being Cut Down Again For Metro Work
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..