पैशांसाठी चक्क प्रियकरालाच पळविले, प्रेयसीसह सात जणांना अटक

राहुल क्षीरसागर
Monday, 2 November 2020

तरुणाचे गावात असताना नर्गिस या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. हा तरुण ठाण्यातील वागळे इस्टेट येथे वास्तव्यास आल्यानंतर नर्गिसही तिच्या वडिलांना घेऊन वसई येथे तिची नातेवाईक सबीना हिच्या घरी आली. या ठिकाणी आल्यानंतर अपहरणाचा कट रचण्यात आला.

ठाणे- शहरातील वागळे इस्टेट भागात वास्तव्यास असलेल्या एका तरुणाचे त्याच्याच प्रेयसीने अपहरण केल्याची घटना वागळे इस्टेट पोलिसांनी उघडकीस आणली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, तरुणीसह सात जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तरुणाकडून पैसे मिळविण्यासाठी त्यांनी हे अपहरण केल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

आधी सरकारशी हात जोडून बोलू, नाहीतर हात सोडून बोलू राज ठाकरे यांचा इशारा

नर्गिस शेख (20), मोहम्मद जावेद शेख (40), मोहम्मद परवेज शेख (29), सबीना परवेज शेख (31), अमित परिधनकर (28), अरुण पणीकर (24), लोकेश पुजारी (24) अशी अटक आरोपींची नावे आहेत. उत्तर प्रदेश येथून काही दिवसांपूर्वीच वागळे इस्टेट येथे भावाकडे वास्तव्यास आला होता. या तरुणाचे गावात असताना नर्गिस या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. हा तरुण ठाण्यातील वागळे इस्टेट येथे वास्तव्यास आल्यानंतर नर्गिसही तिच्या वडिलांना घेऊन वसई येथे तिची नातेवाईक सबीना हिच्या घरी आली. या ठिकाणी आल्यानंतर अपहरणाचा कट रचण्यात आला. त्यानुसार 31 ऑक्‍टोबरला तरुण कामाच्या ठिकाणी आला व नर्गिसने त्याच्याशी संपर्क साधून वसई येथील बजरंग ढाबा परिसरात बोलावले.

तरुण त्या ठिकाणी पोहचल्यानंतर एक चारचाकी वाहन त्या ठिकाणी आले. या वाहनात नर्गिस, तिचे वडील मोहम्मद जावेद शेख आणि त्यांचे पाच साथीदार होते. या सात जणांनी तरुणाला वाहनात खेचले आणि त्याला वसईला नेले. त्यानंतर तेथील एका घरात कोंडून ठेवले. त्यानंतर तरुणाच्या भावाला फोन करून अपहरणकर्त्यांनी चार लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या तरुणाच्या भावाने याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता ढोले, पोलिस निरीक्षक विजय मुतडक यांनी पथके तयार करून तपास सुरू केला.

त्या वेळी तरुणाला वसईमध्ये अपहरण करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत तरुणाची प्रियसी नर्गिस, तिचे वडील मोहम्मद जावेद शेख यांच्यासह सात जणांना ताब्यात घेऊन अटक केली. या वेळी आरोपींकडे चौकशी केली असता, तरुणाकडून पैसे मिळविण्यासाठी त्यांनी हे अपहरण केल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

(संपादन- बापू सावंत)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abduction of boyfriend in Thane, seven accused arrested