राष्ट्रवादीकडून सत्तेचा गैरवापर; प्रशांत ठाकूर यांचा आरोप 

महेंद्र दुसार
Thursday, 22 October 2020

सत्ता ही कायम स्वरूपाची नाही, याचा त्यांना विसर पडला आहे. वेळप्रसंगी रायगड जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशारा भाजपचे उत्तर जिल्हा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला. 

अलिबाग : अनावधानाने सत्तेत आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हे सत्तेचा गैरवापर करून पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव आणून विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सत्ता ही कायम स्वरूपाची नाही, याचा त्यांना विसर पडला आहे. वेळप्रसंगी रायगड जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशारा भाजपचे उत्तर जिल्हा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला. 

हे वाचा : लोकल वेळेचे गणित जुळेना

पेण नगरपालिकेमध्ये सध्या सत्ताधारी विरुद्ध मुख्याधिकारी हा वाद विकोपाला गेला आहे. या संदर्भात आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उरणचे आमदार महेश बालदी, पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्षा वैशाली कडू, नगरसेवक दर्शन बाफना, प्रशांत ओक आदी उपस्थित होते. 

हे वाचा : देशद्रोह प्रकरणी कंगनाला समन्स

ठाकूर यांनी सांगितले की, 16 तारखेला पेण नगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत राजकीय दूषित हेतूने मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार दाखल केली आहे. अशी तक्रार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झाली आहे. खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या दबावामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे; असा प्रघात पाडणे हे घातक आहे. असे देखील आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक व पोलिस प्रशासन खासदारांच्या दबावाखाली काम करत आहेत. भाजप हा त्यांचा शत्रू आहे, असे समजून सत्तेची ताकद वापरून तटकरे राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भाजप ते सहन करणार नाही. या दबाव तंत्राविरोधात वेळप्रसंगी भाजप कार्यकर्ते रस्त्यावरदेखील उतरणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abuse of power by the Nationalist Congress; Allegation of Prashant Thakur