देशद्रोह आरोप प्रकरणी मुंबई पोलिसांकडून कंगनाला समन्स; सोमवारी चौकशीस हजर राहण्याच्या सूचना

सुमित बागुल
Wednesday, 21 October 2020

कंगनासोबतच तिची बहीण रंगोली रनौतला देखील समन्स बजावण्यात आलाय. रंगोली यांचंही नाव FIR मध्ये असल्याने त्यांनाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आलंय.

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतची सोमवारी मुंबईत पोलिसांकडून चौकशी होणार आहे. अभिनेत्री कंगना रनौतवर देशद्रोहाचे आरोप आहेत. याप्रकरणी आता येत्या सोमवारी म्हणजेच २६ तारखेला कंगनाची मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. गेल्या काळात कंगना रनौतने विविध ट्विट्स केले होते. त्या ट्विट्स आणि व्हिडीओच्या  पार्श्वभूमीवरून ही केस उभी राहिली आहे.    

मिळालेल्या माहितीनुसार येत्या सोमवारी कंगना रनौतला मुंबई पोलिसांकडून चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आलाय. सध्या कंगना रनौत मनालीमध्ये आहे. येत्या सोमवारी इन्व्हेस्टीगेशन ऑफिसर समोर हजर राहण्याचा समन्स मुंबई पोलिसांकडून कंगना रनौतला देण्यात आलाय. १५६ (३) अंतर्गत कंगनावर गुन्हा नोंदवण्यात आलाय. त्याप्रकरणी कंगना रनौतची मुंबई पोलिसांकडून चैकशी केली जाणार आहे.

महत्त्वाची बातमी : नाथाभाऊंच्या सोडचिठ्ठीनंतर मुंबई भाजपचा बडा नेता पक्ष सोडणार ?

गेल्या काही काळात कंगनाने केलेले ट्विट्स, तिने शेअर केलेले व्हिडीओ त्याचसोबत बांद्रा मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेटसमोर करण्यात आलेल्या तक्रारीनंतर तपास करण्यात आला आणि त्यानंतर या सर्वांवर कंगनाकडून उत्तर अपेक्षित आहे. म्हणून कंगनाला समन्स बजावण्यात आलाय. 

या प्रकरणात कंगनासोबतच तिची बहीण रंगोली रनौतला देखील समन्स बजावण्यात आलाय. रंगोली यांचंही नाव FIR मध्ये असल्याने त्यांनाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आलंय. रंगोली यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे.

कंगनाच्या भावाचं येत्या काही दिवसांमध्ये लग्न आहे. अशात मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या समन्सनंतर कंगना मुंबई चौकशीसाठी येणार का थेट कोर्टात जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

mumbai police issued summonsed to kangana ranaut under case of treason


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai police issued summonsed to kangana ranaut under case of treason