अशी असेल मध्य रेल्वेवर धावणारी 'ठंडा ठंडा, कुल कुल' लोकल..    

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

 • एसी लोकलची वैशिष्ट्ये 
  - किमान वेग 110 ताशी किमी 
  - आसनांची संख्या 1,028 
  - उभ्याने 5,936 जणांचा प्रवास 
  - स्वयंचलित दरवाजांचे नियंत्रण मोटरमन आणि गार्डकडे 
  - डब्यांमध्ये टॉकबॅक यंत्रणा  

मुंबई : मध्य रेल्वेची पहिली वातानुकूलित (एसी) लोकल येत्या महिन्याभरात प्रत्यक्षात धावणार असून या लोकलच्या पहिल्या फेरीचे सारथ्य महिला मोटरवुमन करणार आहे. या एसी लोकलच्या दिवसभरात 10 ते 12 फेऱ्या होईल. लोकल नेमकी कोणत्या मार्गावर धावणार याबाबतचा निर्णय प्रवासी संघटनांसोबत चर्चा करुन घेण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी सांगितले. 

महिन्याभरात एसी लोकल चालविण्यापूर्वी प्रवाशांचे मतही विचारात घेतले जाणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील पुलांच्या कमी उंचीमुळे पहिली एसी लोकल 2017 मध्ये पश्‍चिम रेल्वेला देण्यात आली. अखेर कुर्ला कारशेडमध्ये सोमवारी मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल दाखल झाली आहे. या लोकलमध्ये काही तांत्रिक बदल करुन चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

महत्त्वाची बातमी :  "कोण म्हणालं आम्ही भाजपसोबत कधीच जाणार नाही?" शिवसेनेच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
 

ही लोकल "मेक इन इंडिया' धोरणातंर्गत बांधली असून त्यासाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च आला आहे. भारत हेवी इलेक्‍ट्रिकल लि. (भेल) ने त्यासाठी विद्युत यंत्रणा पुरविली आहे. चेन्नईतील "आयसीएफ' कारखान्यात ही लोकल तयार करण्यात आली आहे. या एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे असल्याने त्याबाबत वारंवार उद्घोषणा केली जाणार आहे. लोकलमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे असून आपातकालीन परिस्थिती उदभवल्यास किंवा दरवाजा लवकर बंद न झाल्यास मदतीसाठी मध्य रेल्वेने 100 कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलेले आहे. एसी लोकल चालविताना येणाऱ्या तांत्रिक गोष्टीचा आढावा घेऊन पश्‍चिम रेल्वेकडून हे प्रशिक्षण घेतले असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. 

महत्त्वाची बातमी :  देवेद्र फडणविसांचा 'ठाकरे सरकार'वर हल्लाबोल, म्हणालेत..
 

आणखी 5 एसी लोकल येणार 

मध्य आणि पश्‍चिम रेल्वेला पहिल्या टप्यात प्रत्येकी 6 अशा एकूण 12 एसी लोकल येणार आहेत. पश्‍चिम रेल्वेकडे 6 पैकी 5 एसी लोकल आलेल्या आहेत. तर मध्य रेल्वेची दुसरी एसी लोकल मार्च महिन्यापर्यत तर उरलेल्या 4 लोकल डिसेंबर 2020 पर्यत येतील, असा विश्वास विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी व्यक्त केला आहे. 

तिकिट दरावरुन नाराजी 

उन्हाळ्यात या लोकलचा निश्‍चितच फायदा होईल. मात्र, साध्या लोकलच्या प्रथम श्रेणी तिकिटापेक्षा एसी लोकलचे तिकिट 1.3 पटीने जास्त असल्याने प्रवाशांनी एसी लोकलच्या तिकीट दरावर नाराजी व्यक्त केली. 

Webtitle : ac local will now run on central railway know all the details


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ac local will now run on central railway know all the details