ऐन प्रयोगावेळीच "घाणेकर'चा एसी बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

कलाकारांचा समाजमाध्यमांवर संताप; यंत्रणा अचानक बंद पडल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण 

ठाणे : मराठी नाट्यगृह आणि त्यातील बिघडलेली एखादी यंत्रणा हे समीकरण प्रेक्षकांसह कलाकारांनाही नवे नाही. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील भोंगळ कारभाराचा फटका अनेक कलाकारांना सहन करावा लागला असून समाजमाध्यमातून कलाकार आपल्या समस्यांना वारंवार वाचा फोडत आले आहेत. शनिवारीही (ता. 20) अभिनेता भरत जाधव यांच्या एका नाट्याचा प्रयोग घाणेकर नाट्यगृहात सुरू असताना वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवण्यात आली होती.

याविषयी भरत जाधवने फेसबुकवर व्हिडीओ प्रदर्शित करून डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात कलाकारांना मिळत असलेल्या वागणुकीविषयी आणि गैरसोईंविषयी संताप व्यक्त केला आहे. समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर रसिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान घाणेकर नाट्यगृहातील रंगमंच व त्यामागील एसीमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने तो बंद झाला होता; मात्र नंतर त्याची दुरुस्ती करण्यात आल्याचे नाट्यगृह व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले.

काही महिन्यांपूर्वीच सांगली येथील नाट्यगृहात एसीची सुविधा नसल्याने अभिनेते वैभव मांगले हे प्रयोगादरम्यान चक्कर येऊन कोसळले होते. मराठी नाट्यगृहांच्या दुरवस्थेविषयी समाजमाध्यमातून मराठी कलाकार सुमित राघवन, प्रशांत दामले, मुक्ता बर्वे, भरत जाधव यांनी यापूर्वी उघडपणे आपले मत व्यक्त केले आहे.

शनिवारीही ठाण्यातील घाणेकर नाट्यगृहात भरत जाधवच्या नाटकाचा प्रयोग सुरू असताना वातानुकूलित यंत्रणा बंद होती. ती सुरू करण्याविषयी वारंवार येथील कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले; परंतु "एसी चालू आहे..., वाढवतो..., एसी चालू करतो' अशी उत्तरे मिळत राहिली. प्रत्यक्षात एसी सुरू झालाच नाही. उकाड्याने हैराण झालेले कलाकार घामाने अक्षरशः भिजले होते.

घामाने भिजलेल्या अवस्थेत भरतचा व्हिडीओ 
कलाकरांना मिळत असलेल्या वागणुकीविषयी आणि गैरसोईंविषयी संताप व्यक्त करत भरतने घामाने भिजलेल्या अवस्थेत फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत "मी ओलाचिंब झालेलो आहे. तुम्हाला वाटेल पावसात भिजलोय; परंतु पावसात नाही तर घामाने मी चिंब भिजलो आहे.

घाणेकर नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग सुरू आहे आणि येथील एसी यंत्रणा बंद ठेवण्यात आली आहे. नाट्यगृहाकडून संपूर्ण भाडे आकारले जाते; परंतु सुविधा मात्र देण्यात येत नाही. हा अनुभव पहिल्यांदा नाही, तर यापूर्वीही दोन-तीन वेळा आला आहे. कुणीही याची दखल घेत नसल्याने थेट नाट्यरसिकसिंपुढे समाजमाध्यमाद्वारे पुढे येण्याचे ठरवीत हा व्हिडीओ पोस्ट केल्याचे त्याने या व्हिडीओत स्पष्ट केले.

घाणेकर नाट्यगृहातील प्रेक्षागृहातील वातानुकूलित यंत्रणा चालू आहेत. रंगमंच व कलाकार दालन येथील एसीमध्ये शनिवारी सकाळी अचानक बिघाड झाला. तत्काळ एजन्सीला बोलवून दुरुस्तीचे काम सुरू केले होते. एसी बंद असल्याची कल्पना भरत जाधव यांना देण्यात आली होती. शनिवारी संध्याकाळी एसी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. 
- संदीप माळवी,
जनसंपर्क अधिकारी 

प्रयोगादरम्यान नाट्यगृहात आपण उपस्थित होतो. आपण स्वतःच घाणेकर नाट्यगृहातील असुविधांविषयी गेली दोन वर्षे पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. परंतु प्रशासनाला अद्यापही जाग येत नसून रसिकांसह कलाकारांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कलाकारांना झालेल्या त्रासाविषयी मी दिलगीरी व्यक्त करते. 
- स्नेहा आंब्रे,
स्थानिक नगरसेविका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AC systeme collaps in Dr, Kashinath Ghanekar Natygruh