
गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण 26 टक्क्यांनी कमी झाले; मात्र अपघाती मृत्यूची संख्या कमी होऊ शकली नाही.
मुंबई : गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण 26 टक्क्यांनी कमी झाले; मात्र अपघाती मृत्यूची संख्या कमी होऊ शकली नाही. लॉकडाऊनच्या नऊ महिन्यांत रस्त्यावर वाहनांची विशेष वर्दळ नव्हती; मात्र या कालावधीत रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 10 हजारांच्या आसपास आहे. गेल्या पाच वर्षांत वर्षाला सरासरी 13 हजार मृत्यू होतात. यामध्ये सर्वाधिक सायकल, मोटरसायकल, पादचाऱ्यांचा समावेश असल्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.
अपघात आणि अपघाती मृत्यू टाळण्यासाठी जिल्हा पातळीवर रस्ते सुरक्षा समित्यांची स्थापना केली जाते; मात्र अपघात कमी करण्यासाठी या समित्यांकडून प्रभावी कामगिरी होत नसल्याचे चित्र आहे. राज्यभरातील "ब्लॅक स्पॉट'वरच्या अपघाताची संख्याही कमी करण्यात अपयश आले. राज्यातील 1324 प्रमुख ब्लॅक स्पॉट शोधून त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
रस्ते सुरक्षा समित्यांना या वर्षात तब्बल 20 टक्के अपघाती मृत्यू कमी करण्याचे लक्ष्य होते; मात्र केवळ अपघाताचे प्रमाण 15 टक्केच कमी झाले आहे. कोरोना काळात अपघाताचे प्रमाण घटवणे शक्य नाही. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, पुणे, यवतमाळ, बीड, जालना या जिल्ह्यांत सर्वांत जास्त अपघात झाले आहेत.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
44 पैकी 28 विभाग अपयशी
राज्यातील 44 पोलिस विभागांपैकी 28 विभागांनी अपघाताच्या प्रमाणात 20 टक्के घट करण्याचे लक्ष्य न गाठल्याचे समोर आले. यामध्ये अमरावती ग्रामीण, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम, औरंगाबाद ग्रामीण, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, कोल्हापूर, सांगली, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर ग्रामीण, वर्धा, धुळे, जळगाव, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर, नंदुरबार, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, पिंपरी-चिंचवडचा समावेश होतो.
जानेवारी ते नोव्हेंबर 2019 अपघात, मृत्यूची आकडेवारी
एकूण विभाग - एकूण अपघात- एकूण मृत्यू - एकूण गंभीर जखमी
44 विभाग- 30,005 - 11,634 - 26,235
---
जानेवारी ते नोव्हेंबर 2020 अपघात, मृत्यूची आकडेवारी
एकूण विभाग - एकूण अपघात - एकूण मृत्यू - एकूण गंभीर जखमी
44 विभाग- 22,196 - 9920 - 17,683
Accidents decreased deaths increased Ten thousand people died in nine months in lockdown
-----------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )