'कोरोना काळात जन्माला आलेल्या नवजात बाळांची काळजी घेणे महत्वाचे'

भाग्यश्री भुवड
Sunday, 18 October 2020

न्यूमोनिया, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिजिज किंवा फुफ्फुसांच्या इतर आजारांमुळे ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते. अशा स्थितीत नवजात बाळांची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे.

मुंबई : कोरोना विषाणूसंसर्गाने बाधित फुफ्फुसांमुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी खाली जाते. मात्र, कोरोना व्हायरसच्या संसर्गा व्यतिरिक्त अन्य आजारांमुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी खालावू शकते, असे आता वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. न्यूमोनिया, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिजिज किंवा फुफ्फुसांच्या इतर आजारांमुळे ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते. अशा स्थितीत नवजात बाळांची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे.

कोरोना काळात जन्माला आलेल्या नवजात बाळांची विशेत्वाने काळजी घेणे महत्वाचे झाले आहे. कोरोना काळ जसा गर्भवतींना आव्हानात्मक आहे तसाच तो नवजात बाळाच्या आरोग्यासाठी जिकरीचा आहे.

यावर बोलताना फोर्टिस रुग्णालयाच्या पिडिआट्रिक कार्डिओलॉजी डॉ. स्वाती गारेकर यांनी सांगितले की, नवजात बाळ निळे दिसो वा ना दिसो, त्याची साधी पल्स ऑक्सिमीटर तपासणी केली पाहिजे. ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास बाळ तीन-चार दिवसांत हळूहळू निळे पडू लागते. नंतर काहीतरी समस्या आहे ही गोष्ट पालकांच्या लक्षात येईपर्यंत ते गंभीररित्या आजारी पडते. बाळांमधील अनेक प्रकारच्या हृदयदोषांमुळे त्यांच्या शरीरातील निळे (अशुद्ध) आणि लाल (शुद्ध) रक्त अनैसर्गिकरित्या एकमेकांमध्ये मिसळते किंवा फुफ्फुसांपर्यंत पुरेसे रक्त पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो. तेव्हा फुफ्फुसे सुदृढ असतील तरीही रक्तातील ऑक्सिजनची पातळी घसरल्याचे पल्स ऑक्सिमीटरमुळे कळून येते.

अधिक वाचाः  कोविडमुक्त 22 वर्षीय रुग्णावर यकृत प्रत्यारोपण, भारतातील पहिली शस्त्रक्रिया

बाळाच्या हृदयामध्ये एखादा विशिष्ट जन्मजात दोष असेल तर ही पातळी धोकादायक स्तरापर्यंत खाली घसरते. बाळ निळे पडू लागले तर वैद्यकीय टीम या गोष्टीची तपासणी करून समस्या शोधून काढू शकतात. बाळाच्या फुफ्फुसात दोष आहे की हृदयामध्ये दोष आहे हे ठरवू शकतात. बाळाच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी असल्याचे निदान झाले तर त्या बाळाच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते आणि हृदयाच्या कार्यात खरोखरंच काही दोष आहे का हे तपासण्यासाठी एकोकार्डिओग्राम (हृदयाची अल्ट्रासाउंड तपासणी) काढला जातो. तेव्हा पल्स ऑक्सिमीटर रीडिंग हे फायद्याचे आहे कारण त्याच्यामुळे हृदयदोष असलेल्या बाळांच्या आजाराचे निदान होऊन लवकरात लवकर उपचार सुरू करता येतात, असेही त्या म्हणाल्या.

----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

According medical experts take special care newborns born during Corona period


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: According medical experts take special care newborns born during Corona period